
भारतीय संघाने आयर्लंडनंतर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका गमावली आहे. चौथ्या सामन्यात भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 159 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान इंग्लंडने 13.5 षटकात 1 गडी गमवून पूर्ण केलं. या पराभवानंतर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वावर बोट दाखवलं जात आहे. कारण आयर्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतर इंग्लंडविरुद्ध दुसरं अपयश आहे. श्रेयस अय्यरने हातात धुरा घेतल्यापासून पाचवा पराभव झाला आहे. सहा सामन्यात एक सामना पावसामुळे रद्द झाला आणि पाच सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. चौथ्या सामन्यात श्रेयस अय्यरने कर्णधारपदाला साजेशी फलंदाजी केली. पण त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. श्रेयस अय्यरने 49 चेंडूत 6 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने नाबाद 80 धावा केल्या. पण त्याची खेळी व्यर्थ ठरली. चौथ्या सामन्यातील पराभव आणि मालिका गमावल्यानंतर कर्णधार अय्यरने संताप व्यक्त केलं आहे. इतकंच काय तर या सामन्यात काय चुकलं? याचा पाढा वाचला.
टीम इंडियाचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, ‘पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी झाली. 158 धावांची धावसंख्या योग्य नव्हती. अखेरीस, त्यांनी किती वेगाने धावांचा पाठलाग केला हे आपण पाहिलेच. जेव्हा आम्ही गोलंदाजीसाठी आलो, तेव्हा मी गोलंदाजांना शक्य तितके चेंडू एकाच टप्प्यावर टाकण्यास सांगितले. मधल्या आणि लेग स्टंपच्या वरच्या भागावर धावा करणे कठीण होते. आमच्या अंमलबजावणीत आम्ही कमी पडलो. मी माझ्या कामगिरीवर नक्कीच आनंदी आहे, पण जर ती विजयासाठी नसेल तर… हा एक स्थित्यंतराचा टप्पा आहे आणि आमच्याकडून चुका होणारच. परिस्थितीशी जुळवून घेणे किती महत्त्वाचे आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. मला खात्री आहे की संघात लवकर शिकणारे खेळाडू आहेत आणि ते स्वतःचे मूल्यांकन करतील.’
मालिका पराभवामुळे भारताच्या रेकॉर्डवर डाग
- सध्याच्या दोन मालिकांपूर्वी भारताने त्यांच्या शेवटच्या 12 द्विपक्षीय टी20 आंतरराष्ट्रीय मालिकांपैकी 11 मालिका जिंकल्या होत्या. तर डिसेंबर 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेली मालिका 1-1 अशी अनिर्णित राहिली होती. पण आता आयर्लंडनंतर इंग्लंडविरुद्धची टी20 मालिका भारताने गमावली आहे.
- दोन किंवा त्याहून अधिक सामन्यांच्या द्विपक्षीय टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेत इंग्लंडने भारताचा पराभव करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वीच्या सहापैकी पाच मालिका भारताने जिंकल्या होत्या, तर एक मालिका बरोबरीत सुटली होती.
- इंग्लंडविरुद्धच्या द्विपक्षीय मालिकेत भारताचा मागील दोन वेळा झालेला पराभव 2018 च्या दौऱ्यात झाला होता तेव्हा एकदिवसीय मालिकेत 2-1 आणि कसोटी मालिकेत 4-1 असा पराभव झाला होता. त्यानंतर मालिकेपूर्वी भारताने 10 पैकी आठ मालिका जिंकल्या होत्या. तर इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या मागील दोन कसोटी मालिका अनिर्णित 2-2 अशा बरोबरीत सुटल्या होत्या.
Leave a Reply