
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीमुळे ते दिल्लीत जाण्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. कारण गेल्या काही काळापासून केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याला खास महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र आता खुद्द फडणवीस यांनीच केंद्रीय मंत्रिमंडळात सामील होणार असल्याच्या चर्चांवर भाष्य केले आहे. फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.
PM मोदींची घेतली भेट
पंतप्रधान मोदी यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी म्हटले की, आज पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली, यावेळी राज्यात एकूण प्रशासन आणि प्रकल्प या संदर्भात माहिती दिली. केंद्र सरकारसोबत काही प्रकल्पांची चर्चा सुरु आहे, त्याची माहिती दिली. केंद्राकडून काय मदत अपेक्षित आहे, ते पत्र दिलं आहे. उत्तन ते विरार कॉरिडॉर आहे, त्याच्या संदर्भात आपण जायकाला प्रपोझल दिलं आहे. अशा विविध प्रकल्पांच्या संदर्भात, मेट्रोच्या संदर्भात, आपला नदीजोड प्रकल्प असेल, अशा विविध संदर्भात त्याची त्यांना माहिती दिली आहे.
पुढे बोलताना फडणवीस यांनी म्हटले की, मी भूपेंद्र यादव यांचीही भेट घेतली. पर्यावरण आणि वन याच्या ज्या काही मंजुरी थांबल्या आहेत, वेगवेगळ्या स्टेजेसवर आहेत, त्याची माहिती दिली, फॉलोअप केला. त्यांनीदेखील अतिशय वेगाने मान्यता देण्यात येईल, असं सांगितलं. पियुष गोयल आणि निर्मला सीतारमण यांच्यासोबत उद्योगांसंदर्भातील बैठक आहे. देशभरातील मुख्यमंत्री, इंडस्ट्रियल मिनिस्टर त्याला उपस्थित असतील, औद्यौगिक वसाहती आपण केंद्र सरकारच्या मदतीने तयार करतोय, त्यातील प्रगती आणि अडचणी यावर या बैठकीत चर्रा होईल, असं त्यांनी नमूद केलं.
मी महाराष्ट्रातच आहे – फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाणार असल्याच्याही चर्चा सुरू आहेत. याबाबत प्रश्न विचारला असता फडणवीस यांनी म्हटले की, ‘मी दिल्लीत असलो तरी चर्चा, मुंबईत असलो तरी चर्चा. अनेक रिकामटेकडे लोकं आहेत. ज्याला जे तारे तोडायचे आहेत, ज्याला जे पतंग, फुगे उडवायचे ते उडवू द्या. मी महाराष्ट्रात आहे, जनता आणि मोदींनी मला महाराष्ट्राची जबाबदारी दिली आहे. अनेक लोकांना असं वाटतं मी दिल्लीत गेलं पाहिजे, पण त्या सगळ्यांना सांगतो मी मुंबईतच आहे.’
Leave a Reply