
विनायक डावरुंग, प्रतिनिधी : लालबागमधील ठाकरे बंधुंचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. महाराष्ट्र गीत सुरू असताना दोन्ही ठाकरे बंधू एकाजागी उभे राहिले नाहीत. त्यावरुन भाजपने अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. काल संध्याकाळी लालबाग सेंटर पॉइंट जवळून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटीच्या बसेस सोडण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी आमदार आदित्य ठाकरे, अमित ठाकरे आले होते. मनसे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकर यांच्या संकल्पनेतून दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी लालबाग येथून एसटी बसेस सोडण्यात येतात. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोफत एसटीची सेवा दिली जाते. खेड, चिपळूण, महाड, रत्नागिरी, मालवण, कुडाळ येथे या बसेस जातात. गुरुवारी संध्याकाळी सेंटर पॉइंट जवळ हा कार्यक्रम पार पडला.
त्यावेळी महाराष्ट्र गीत सुरु असताना दोन्ही ठाकरे बंधु एकाजागी उभे नव्हते. त्यावर भाजपचे प्रवक्ते आणि नगरसेवक नवनाथ बन यांनी एक्सवर पोस्ट करुन अमित आणि आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. “मराठी माणसाच्या नावाने राजकारण करायचं आणि प्रत्यक्षात महाराष्ट्राचाच अपमान करायचा हीच ठाकरे बंधूंची नवी कार्यपद्धती!. राज्यगीत सुरू असताना साधं एकाजागी उभं राहण्याचं भानही राहू नये? महाराष्ट्राच्या अस्मितेच्या गप्पा मारणाऱ्यांकडूनच राज्यगीताचा असा अवमान होत असेल, तर हा महाराष्ट्राचा अपमान नाही का?” असा प्रश्न नवनाथ बन यांनी विचारला आहे.
हे पुन्हा एकदा सिद्ध झालं
“मराठी माणूस, महाराष्ट्र आणि मराठी अस्मितेचा ठेका घेत फिरणाऱ्यांनी आधी राज्यगीताचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा सन्मान कसा करायचा, हे शिकावं!. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंचं मराठी आणि महाराष्ट्र प्रेम केवळ राजकारणासाठी हे पुन्हा एकदा सिद्ध झालं !” अशा शब्दात नवनाथ बन यांनी निशाणा साधला.
मराठी माणसाच्या नावाने राजकारण करायचं आणि प्रत्यक्षात महाराष्ट्राचाच अपमान करायचा हीच ठाकरे बंधूंची नवी कार्यपद्धती!
राज्यगीत सुरू असताना साधं एकाजागी उभं राहण्याचं भानही राहू नये? महाराष्ट्राच्या अस्मितेच्या गप्पा मारणाऱ्यांकडूनच राज्यगीताचा असा अवमान होत असेल, तर हा… pic.twitter.com/zhultmGN6c
— Navnath Kamal Uttamrao Ban (@NavnathBanBJP) September 11, 2026
एकत्र येण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही
शिवसेनेच्या स्थापनेपासून मराठी माणूस आणि महाराष्ट्राची अस्मिता ठाकरेंच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिले आहेत. लालबाग-परळ हा भाग सुरुवातीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर इथेही पडझड झाली आहे. महापालिका निवडणुकीपासून उद्धव ठाकरे गट आणि मनसे यांचं मनोमिलन झालं. प्रस्थापित राजकारणात दोन्ही ठाकरे बंधुंना एकत्र येण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. काल कोकणात जाणाऱ्या एसटी बसेसना हिरवा कंदिल दाखवण्याच्या निमित्ताने दोन्ही ठाकरे बंधु पुन्हा एकत्र आले.
Leave a Reply