
भारतात आयपीएल स्पर्धा खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेतील 19 व्या मोसमात (IPL 2026) आतापर्यंत प्रत्येक संघाने किमान 4 सामने खेळले आहेत. तर दुसऱ्या बाजूला वुमन्स टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. वुमन्स टीम इंडिया या दौऱ्यात टी 20i मालिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार आहे. तर त्याआधी बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्याचा निकाल समोर आला आहे. पाहुण्या न्यूझीलंडने या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या मॅचमध्ये बांगलादेशला पराभूत करत विजयी सलामी दिली आहे. न्यूझीलंडने या विजयासह मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली आहे.
सध्या आयपीएल आणि पीएसएल टी 20 स्पर्धा खेळवण्यात येत आहेत. या स्पर्धेत न्यूझीलंडचे खेळाडू सहभागी झाले आहेत. त्यामुळे न्यूझीलंडच्या बी टीमला बांगलादेश दौऱ्यावर पाठवण्यात आलंय. मात्र या बी टीमनेही बांगलादेशला चितपट केलं आहे. न्यूझीलंडने बांगलादेशवर 26 धावांनी हा विजय मिळवला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी बांगलादेशसमोर 247 धावांचा यशस्वी बचाव केला. न्यूझीलंडने बांगलादेशसमोर 248 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर बांगलादेशला पूर्ण 50 ओव्हरही खेळता आलं नाही. न्यूझीलंडने बांगलादेशला 9 बॉलआधी ऑलआऊट केलं. किवींनी बांगलादेशला 48.3 ओव्हरमध्ये 221 रन्सवर गुंडाळलं.
न्यूझीलंडची बॅटिंग
न्यूझीलंडने टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र न्यूझीलंडच्या फलंदाजांना 100 च्या स्ट्राईक रेटनेही धावा करता आल्या नाहीत. बांगलादेशने न्यूझीलंडला 8 आऊट 247 रन्सवर रोखलं. न्यूझीलंडसाठी दोघांनी अर्धशतक झळकावलं. हेन्री निकोल्स याने सर्वाधिक 68 रन्स केल्या. तर डीन फॉक्सक्राफ्ट याने 59 धावांचं योगदान दिलं. तसेच विल यंग याने 30 धावा जोडल्या. नॅथन स्मिथ याने नाबाद 21 धावा करत न्यूझीलंडला 240 पार पोहचवलं. तर इतरांना अपेक्षित सुरुवात मिळाली. मात्र त्यांना मोठी खेळी करता आली नाही.
बांगलादेशसाठी तास्किन अहमद, शोरिफूल इस्लाम आणि रिषाद हौसेन या तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट मिळवली. तर कॅप्टन मेहदी हसन मिराज आणि नाहिद राना या दोघांनी प्रत्येकी 1-1 फलंदाजाला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
बांगलादेशची बॅटिंग
बांगलादेशसाठी दोघांनी अर्धशतकी खेळी केली. तर इतर दोघांनांही अप्रतिम सुरुवात मिळाली होती. ओपनर सैफ हसन याने सर्वाधिक 57 केल्या. तॉहिद हृदॉय याने 55 धावांची खेळी केली. लिटॉन दास याने 46 धावांचं योगदान दिलं. तर अफीफ हौसेन याने 27 रन्स केल्या. तर इतरांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले.
न्यूझीलंडसाठी ब्लेअर टिकनर याने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. नॅथन स्मिथ याने तिघांना आऊट केलं. तर विलियम ओरुर्क, जेडेन लेनोक्स आणि डीन फॉक्सक्रॉफ्ट या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवत बांगलादेशचं पॅकअप करण्यात योगदान दिलं.
Leave a Reply