
51 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटाने हिंदी सिनेमाच्या इतिहासात वेगळे स्थान निर्माण केले. दमदार कथा, लक्षात राहणारे संवाद, जबरदस्त अभिनय आणि लोकप्रिय गाण्यांमुळे हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. मैत्रीपासून प्रेमापर्यंत जीवनातील अनेक रंग या 6 गाण्यांत पाहायला मिळाले.
हा चित्रपट दुसरा तिसरा कोणता नाही तर सुप्रसिद्ध ‘शोले’ चित्रपट आहे. या चित्रपटातील गाजलेले संवाद तर आजही लोकं मनापासून ऐकतात. या पैकी सर्वात चर्चेतील एक म्हणजे, ‘कितने आदमी थे’, ‘तुम्हारा नाम क्या है बसंती’, ‘हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं’ आणि ‘ये हाथ हमको दे दे ठाकुर’ यांसारखे संवाद आजही लोकप्रिय आहेत. जय, वीरू, ठाकुर आणि गब्बर ही पात्रेही अनेक पिढ्यांना परिचित आहेत.
शोले चित्रपटातील सुपरहिट गाण्यांची मेजवानी आजही रसीकांचं भरभरून मनोरंजन करते. ‘शोले’च्या यशात चित्रपटातील गाण्यांचा मोठा वाटा होता. यातील प्रत्येक गाणे लोकप्रिय झाले. ‘ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे’ आजही मैत्रीचे प्रतीक मानले जाते, तर होळीच्या दिवशी ‘होली के दिन दिल मिल जाते हैं’ची आठवण होते. ‘महबूबा महबूबा’ही आजपर्यंत लोकप्रिय आहे.
कोणत्या गाण्याला कोणाचा आवाज?
‘ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे’ किशोर कुमार आणि मन्ना डे यांनी गायले. ‘कोई हसीना जब रूठ जाती है’ किशोर कुमार यांनी गायले. ‘होली के दिन दिल मिल जाते हैं’ लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजात आहे. ‘जब तक है जां जाने जहां’ लता मंगेशकर यांनी गायले. ‘महबूबा महबूबा’ आर. डी. बर्मन यांच्या आवाजात आहे. जयच्या मृत्यूनंतर ‘ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे’चे सॅड व्हर्जन किशोर कुमार यांनी गायले.
15 ऑगस्ट 1975 रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट सुरुवातीला स्लो ओपनर ठरला. मात्र नंतर त्याने वेग पकडला. रमेश सिप्पी दिग्दर्शित या चित्रपटात अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, संजीव कुमार, अमजद खान, जया बच्चन आणि हेमा मालिनी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. गब्बरविरोधातील संघर्ष आणि जय-वीरूची मैत्री यामुळे ‘शोले’ आजही हिंदी सिनेमाचा क्लासिक मानला जातो.
Leave a Reply