
आज आम्ही तुम्हाला अशा चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, ज्याची कथा एका खऱ्या घटनेवर आधारित आहे. हा चित्रपट 'ब्लॅक अँड व्हाईट' टोनमध्ये बनवण्यात आला आहे. यातील प्रत्येक दृश्यात भीती, वेदना आणि माणुसकी स्पष्टपणे जाणवते. यामध्ये एका सामान्य माणसाची कथा दाखवण्यात आली आहे, जो कठीण परिस्थितीत योग्य मार्ग निवडतो. हीच गोष्ट या चित्रपटाला खास बनवते. हा चित्रपट केवळ इतिहास सांगत नाही, तर कठीण काळात माणूस काय निर्णय घेतो, यावर विचार करायलाही भाग पाडतो. भावनिक खोलीमुळे याला एक 'क्लासिक' चित्रपट मानले जाते.
1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या या प्रसिद्ध हॉलिवूड चित्रपटाचे दिग्दर्शन प्रख्यात चित्रपट निर्माते स्टीवन स्पीलबर्ग यांनी केले होते. याची कथा थॉमस केनेली यांच्या 'शिंडलर्स आर्क' या कादंबरीवर आधारित आहे. याचा पहिला प्रीमियर 30 नोव्हेंबर 1993 रोजी झाला आणि 15 डिसेंबर 1993 रोजी तो चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट मुद्दाम 'ब्लॅक अँड व्हाईट' टोनमध्ये तयार करण्यात आला होता, जेणेकरून डॉक्युमेंटरीसारखा प्रभाव निर्माण होऊ शकेल. यामुळे प्रेक्षकांना त्या काळातील सत्य अधिक जवळून अनुभवता आले आणि त्यांना ही कथा अधिक वास्तववादी वाटली. या चित्रपटाचे नाव ‘शिंडलर्स लिस्ट’ (Schindler's List) आहे.
या चित्रपटात लियाम नीसन यांनी ऑस्कर शिंडलरची भूमिका साकारली आहे. बेन किंग्सले यांनी इत्झाक स्टर्न आणि राल्फ फाइन्स यांनी नाझी अधिकारी अमोन गोएथची भूमिका केली आहे. ही कथा एका जर्मन व्यावसायिकाची आहे, जो सुरुवातीला फक्त फायद्यासाठी फॅक्टरी उघडतो. पण हळूहळू ज्यू लोकांवर होणारे अत्याचार पाहून त्याचे मन परिवर्तन होते. त्यानंतर तो माणुसकीसाठी उभा राहतो आणि सुमारे ११०० लोकांचे प्राण वाचवतो. चित्रपटात लोभापासून माणुसकीपर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. विशेष म्हणजे आजही जगभरात हा चित्रपट अत्यंत प्रेरणादायी मानला जातो.
प्रदर्शनानंतर या चित्रपटाला जगभरातून भरभरून दाद मिळाली. याचे बजेट सुमारे 22 दशलक्ष डॉलर्स (सुमारे १८० कोटी रुपये) होते आणि जागतिक स्तरावर याने सुमारे 322 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 2600 कोटी रुपये) कमावले. या चित्रपटाने एकूण 7 ऑस्कर पुरस्कार जिंकले, ज्यात 'सर्वोत्कृष्ट चित्रपट' आणि 'सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक' या पुरस्कारांचा समावेश आहे. IMDb वर याचे रेटिंग 9 च्या आसपास आहे आणि रॉटन टोमॅटोवर सुमारे 98 टक्के स्कोअर मिळाला आहे. हे आकडे सांगतात की, जगभरात याला किती पसंती मिळाली आणि आजही हा एक 'मास्टरपीस' मानला जातो. या यशामुळे हा चित्रपट एक 'क्लासिक' बनला असून आजही लोक तो आवडीने पाहतात.
आज हा चित्रपट ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ, जिओहॉटस्टार आणि झी५ सारख्या अनेक OTT प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. मात्र, प्लॅटफॉर्मवरील उपलब्धता काळानुसार बदलू शकते. रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांपैकी एक आहे. नवी पिढीही हा चित्रपट सतत पाहत आहे, ज्यावरून हे सिद्ध होते की चांगली कथा कधीही जुनी होत नाही. ’Schindler's List’ हा केवळ एक चित्रपट नाही, तर इतिहास आणि माणुसकीचा अनुभव देणारा एक सखोल प्रवास आहे. हा चित्रपट आजही लोकांच्या हृदयाला स्पर्श करतो आणि त्यांना विचार करायला भाग पाडतो.




Leave a Reply