
बॉलिवूडमध्ये अनेक गाणी प्रदर्शित होताच सुपरहिट ठरतात तर काही गाण्यांना प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागते. मात्र काही गाण्यांचा प्रवास याहूनही वेगळा असतो. सुरुवातीला नाकारले गेलेले एखादे गाणे पुढे जाऊन इतिहास घडवते.
अशीच एक प्रेरणादायी कहाणी आहे 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गदर: एक प्रेम कथा' या चित्रपटातील अजरामर गाणं 'उड जा काले कावां' ची. या चित्रपटासाठी संगीतकार उत्तम सिंग सातत्याने नवीन धून तयार करत होते. जवळपास दीड महिना मेहनत घेतल्यानंतर त्यांनी 'उड जा काले कांवां' या गाण्याची धून तयार केली.
त्यांना विश्वास होता की हे गाणे चित्रपटातील सर्वात महत्त्वाच्या गाण्यांपैकी एक ठरेल. मात्र, ही धून चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांना ऐकवण्यात आली तेव्हा त्यांची प्रतिक्रिया अपेक्षेपेक्षा पूर्णपणे वेगळी होती. धून अधिक प्रभावी करण्यासाठी तब्बल 20 वेळा त्यामध्ये बदल करण्यात आले. तरीही दिग्दर्शक समाधानी नव्हते. त्यामुळे ही धून चित्रपटातून वगळली जाईल, अशीही शक्यता निर्माण झाली होती.
धून नाकारली असली तरी ती अनिल शर्मा यांच्या मनातून जात नव्हती. त्यांनी घरी जाऊन हीच धून आपल्या पत्नीला ऐकवली. संगीताची चांगली जाण असलेल्या त्यांच्या पत्नीने ही धून ऐकताच वेगळे मत व्यक्त केले. त्यांनी स्पष्ट सांगितले की, हे गाणे चित्रपटातून काढून टाकणे ही मोठी चूक ठरेल. योग्य शब्द आणि सादरीकरण मिळाले तर हेच गाणे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पत्नीच्या या सल्ल्यानंतर अनिल शर्मा यांनी गाण्याला आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला.
दोन दशकांहून अधिक काळ लोटल्यानंतरही 'उड जा काले कांवां'ची लोकप्रियता कायम आहे. आजही हे गाणं बॉलिवूडमधील सर्वाधिक आवडत्या रोमँटिक गाण्यांमध्ये गणले जाते. त्याच लोकप्रियतेमुळे 'गदर 2' मध्येही हे गाणे नव्या स्वरूपात पुन्हा सादर करण्यात आले.




Leave a Reply