
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर : द रिव्हेंज' या चित्रपटाने केवळ भारतातच नाही तर जगभरातही प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने अनेक विक्रम मोडले आहेत. भारतात सर्वाधिक कमाई करणारा हा तिसरा चित्रपट ठरला आहे. परंतु आता या चित्रपटाचा खेळ खल्लास करण्यासाठी एक जबरदस्त चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.
या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 329 कोटी रुपये कमावले आहेत. 'धुरंधर 2'ला जगभरातील कमाईच्या बाबतीत मात देण्यासाठी बॉक्स ऑफिसच्या मैदानात उतरलेला हा चित्रपट दुसरा-तिसरा कोणता नसून 'किंग ऑफ पॉप' मायकल जॅक्सनचा बायोपिक 'मायकल' (Michael) आहे.
24 एप्रिल रोजी हा चित्रपट जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. 'डेडलाइन'च्या एका रिपोर्टनुसार 'मायकल'ला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळूनही जगभरात या चित्रपटाने 39 मिलियन डॉलर म्हणजेच 329 कोटी रुपयांची बंपर कमाई केली आहे. तर 'धुरंधर 2'ने पहिल्या दिवशी जगभरात 241 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.
'सॅकनिल्क'ने दिलेल्या रिपोर्टनुसार, 'मायकल'ला भारतात एकूण 3029 शोज मिळाले होते. या चित्रपटाने ओपनिंगमध्ये भारतीय बॉक्स ऑफिसवर 3.8 कोटी रुपयांचं नेट कलेक्शन केलं आहे. याशिवाय पेड प्रीव्ह्यूमधून जवळपास 1.7 कोटी रुपयांची कमाई झाली होती. पेड प्रीव्ह्यू आणि ओपनिंग डेची कमाई मिळून भारतातील नेट कलेक्शनचा आकडा 5.5 कोटी रुपये आणि ग्रॉस कलेक्शनचा आकडा 6.6 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
मायकल जॅक्सनच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटावरून प्रदर्शनापूर्वी बराच मोठा वाद झाला होता. तब्बल 1666 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाची ओपनिंग मात्र तेवढीच जबरदस्त झाली. त्यामुळे 'मायकल' या चित्रपटाचं वादळ 'धुरंधर 2'च्या वर्ल्डवाइड कमाईला ब्रेक लावू शकतो. सोबतच 'दंगल'चा लाइफटाइम ग्लोबल कलेक्शन रेकॉर्ड मोडण्याचं रणवीरच्या चित्रपटाचं स्वप्न अपूर्णच राहू शकतं.




Leave a Reply