
मुंबई हायकोर्ट लिपिक पदाच्या टायपिंग टेस्टदरम्यान कल्याण पश्चिमेतील एपीएमसी मार्केट परिसरात असलेल्या परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ उडाला आहे. महाराष्ट्रभरातून हजारो विद्यार्थी परीक्षेसाठी दाखल झाले होते, मात्र परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींमुळे उमेदवारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सीटींग व्यवस्थेचं योग्य नियोजन नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे. तसेच परीक्षा केंद्रावर कोणतीही स्पष्ट व्यवस्था व तपासणी नसल्याची तक्रार देखील विद्यार्थ्यांनी केली आहे. अनेक संगणक धुळखात पडलेले होते, तर काही संगणक सुरूच होत नसल्याने विद्यार्थ्यांना अर्धा तासांहून अधिक वेळ प्रतीक्षा करावी लागल्याचं समोर आलं आहे.
संगणक सुरू झाल्यानंतरही सर्व्हर प्रतिसाद देत नसल्याने टायपिंग टेस्ट रखडली आणि विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सकाळी 10 वाजताच्या सत्रातील उमेदवार अडकले असतानाच सव्वा बारा आणि 3 वाजताच्या सत्रातील शेकडो विद्यार्थीही परीक्षा केंद्रावर पोहोचल्याने गर्दी वाढली. जवळपास 250 हून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राबाहेर संताप व्यक्त करत निषेध आंदोलन केले आहे. पालकांनीही व्यवस्थापनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.
पिण्याच्या पाण्यासह मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा आरोप देखील विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे दूरवरून आलेल्या उमेदवारांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. वाढता तणाव लक्षात घेता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ,परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बंदोबस्त वाढवला आहे. दरम्यान, संस्थेचे संचालक संजय वानखेडे यांनी तांत्रिक अडचणीमुळे प्रिंट प्रक्रिया उशिराने होत असल्याचे सांगत समस्या दूर करण्याचे काम सुरू असल्याची माहिती दिली आहे. या सर्व गोंधळाचा विचार करून ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.
Leave a Reply