
‘ससुराल सिमर का’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दीपिका कक्कर सतत आरोग्याच्या विविध समस्यांचा सामना करतेय. गेल्या वर्षी मे महिन्यात तिला लिव्हर कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यावर सर्जरी आणि इतर उपचार पार पडल्यानंतर पुन्हा यावर्षी मार्च महिन्यात तिच्या पोटात सिस्ट आढळले. त्यासाठी दीपिकावर पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आता नव्याने केलेल्या चाचण्यांमध्ये आणि स्कॅनमध्ये दीपिकाच्या पोटात दोन नवे सिस्ट पुन्हा आढळून आले आहेत. दीपिकाचा पती शोएब इब्राहिमने युट्यूबवरील व्लॉगमध्ये याबद्दलची माहिती दिली. हे दोन्ही सिस्ट खूप लहान असल्याने त्यावर सध्या उपचार केले जाऊ शकत नाहीत, असं त्याने सांगितलं आहे. यावेळी शोएबने असंही सांगितलं की दीपिका या आठवड्यापासून इम्युनोथेरपीची सुरुवात करणार आहे.
दीपिका आणि शोएब युट्यूबवर सक्रिय असून तिथे ते विविध व्लॉग्स चाहत्यांसोबत शेअर करत असतात. नुकत्याच पोस्ट केलेल्या व्लॉगमध्ये शोएबने दीपिकाच्या एमआरआय रिपोर्ट्सविषयी खुलासा केला. तो म्हणाला, “आम्ही गेल्या सोमवारी एमआरआय करायला गेलो होतो, तेव्हापासून सतत रुग्णालयाच्या फेऱ्या मारतोय. कारण एमआरआयमध्ये दोन छोटे सिस्ट दिसून आले. हे सिस्ट इतके लहान आहेत की ते सिटी स्कॅनमध्ये दिसून येत नाहीत. परंतु एमआरआयच्या संवेदनशीलतेमुळे ते दिसून आले.”
View this post on Instagram
यावेळी दीपिका म्हणाली, “सध्या ते सिस्ट खूप लहान आहेत. त्यामुळे आता आम्ही त्यावर कोणतेच उपचार करू शकत नाही. एक महिन्यानंतर आम्ही पुन्हा एकदा स्कॅन करणार आहोत. आता हे रुटीनसारखंच झालं आहे. मला सतत स्कॅन करावं लागणार आहे. आम्हाला खूप काळजी घ्यावी लागणार आहे. देव न करो, जर स्कॅनमध्ये पुन्हा काही आढळलं तर लगेच त्यावर उपचार सुरू करू शकतो. जसं आम्ही आधीच्या सिस्टबाबत केलं होतं.”
“डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की ते यावर लक्ष ठेवून असतील आणि जेव्हा त्यांना वाटेल की त्यावर उपचार शक्य आहेत, तेव्हा आम्ही ते सिस्ट काढून टाकू. दीपिकाची इम्युनोथेरपीसुद्धा याच आठवड्यापासून सुरू होणार आहे. आम्हाला अनेक डॉक्टरांना या थेरपीचा सल्ला दिला होता. त्यासाठी आम्हीला दर वीस दिवसांनी रुग्णालयात जावं लागणार आहे आणि प्रत्येक सेशनसाठी चार ते पाच तास लागतील. सध्या काही गंभीर नाही. जे झालं ते झालं.. आम्ही काही करू शकत नाही. आम्ही याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहतोय”, असं शोएबने स्पष्ट केलं.
Leave a Reply