
हिंदू धर्मात मृत्यूनंतरच्या संस्काराला प्रचंड महत्व आहे. मात्र, अहिल्यानगरातील नेवासा तालुक्याच्या सौंदाळा गावातील सरपंचाने आपल्या कृतीतून कर्मकांडांना तिलांजली दिली आहे. या सरपंचाने आपल्या जीवंतपणीत स्वत:चा दशक्रिया विधी पार पाडला आहे आणि त्यांच्या पिंडाला कावळाही शिवला आहे. त्यांच्या या कृतीची सर्वत्र चर्चा सुरु आहे. मृत्यूनंतर संस्कारात वारेमाप खर्च करण्यापेक्षा जीवंतपणी माणसाच्या इच्छा पूर्ण करा असा संदेश आपल्याला द्यायचा होता असे या सरपंचाने म्हटले आहे.
गावात जातमुक्तीचा ठराव करून सामाजिक समतेसाठी काम करणारे नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावचे सरपंच शरद आरगडे यांनी नवा पायंडा पाडला आहे. त्यांनी त्यांच्या जीवंतपणीच स्वतःचा दशक्रिया विधी घालून पिंडदान केले आहे. सामाजिक रुढी, अंधश्रद्धेला तिलांजली देण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे त्यांनी म्हटले आहे. आरगडे यांची पत्नी प्रियंका आणि मुलगा संग्राम यांनी भेंडा येथील स्मशानभूमीत सत्यशोधक पद्धतीने पिंडदान विधी पार पाडला.यावेळी शरद आरगडे यांच्या पिंडाला कावळाही शिवला..
हिंदू धर्मात व्यक्तीच्या निधनानंतर दहाव्या दिवशी पिंडदान आणि उत्तरकार्य करण्याची प्रथा आहे. मृत्यूनंतर अस्थी विसर्जन, दशक्रिया, तेरावा विधीसाठी अवाजवी खर्च केला जातो. माणूस जिवंत असताना मात्र, त्याच्या गरजांकडे बहुतांशी वेळा दुर्लक्ष केले जाते. त्याच्या मृत्यूनंतर मात्र, समाज नाव ठेवू नये,यासाठी बहुतांशी जण मोठा खर्च करतात. मृत्यूनंतर आत्मा शांत होतो किंवा ठरावीक विधी केल्यानंतरच त्याला मोक्ष मिळतो, अशी समजूत समाजामध्ये आहे. लोकांमधील असे गैरसमज दूर करण्यासाठी आपण जिवंतपणीच स्वतः चे पिंडदान केल्याचे सरपंच शरद आरगडे यांनी सांगितले.
मृत्यूनंतर कोणतेही सुतक पाळले जाऊ नये
माझ्या निधनानंतर माझ्या पत्नीने कोणत्याही पारंपारिक रितीरिवाज पाळू नयेत. विधवा म्हणून पाळाव्या लागणाऱ्या प्रथा पाळू नयेत, तिने कुंकू पुसू नये, बांगड्या फोडू नयेत किंवा मंगळसूत्र उतरवू नये असे स्पष्ट नमूद करणारे कायदेशीर प्रतिज्ञापत्र आरगडे यांनी तयार केले आहे. आपल्या मृत्यूनंतर कोणतेही सुतक पाळले जाऊ नये किंवा धार्मिक कर्मकांड करू नये. पतीच्या निधनानंतर पत्नीला सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार असून समाजातील जाचक रुढींमध्ये तिला अडकवू नये असेही त्यांनी प्रतिज्ञापत्रात त्यांनी नमूद केले आहे.
Leave a Reply