
Maharashtra Businessman Death : उत्तर प्रदेशातील वाराणसी हे पवित्र असे धार्मिक स्थळ आहे. देशभरातून हजारो भाविक या शहरात दररोज दाखल होतात. महाराष्ट्रातूनही वाराणसी येथे जाणाऱ्यांची संख्या बरीच आहे. सर्वसाधारण कुटुंबापासून ते अतिश्रीमंत घरातील व्यक्तीपर्यंत सगळेच वाराणसीत जाऊन देवाचे दर्शन घेतात. परंतु वाराणसीमध्ये यात्रेसाठी गेलेल्या महाराष्ट्रातील असाच एका उद्योजकाच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार रायगड येथील 56 वर्षीय व्यावसायिकाची वाराणसीमध्ये असताना अचानक प्रकृती बिघडली. यातच या उद्योजकाचा मृत्यू झाला. त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर काही तासांतच त्यांच्या पत्नी आणि मुलाने हॉटेलच्या खोलीत विषारी पदार्थ सेवन करून स्वत:ला संपवलं आहे. ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
विशाल हे दीर्घकाळापासून गंभीर आजारांनी त्रस्त
मिळालेल्या माहितीनुसार, मृत उद्योजकाचे नाव विशाल मुखर्जी असे आहे. ते आपली पत्नी जया मुखर्जी (51) आणि मुलगा ईशान मुखर्जी (26) यांच्यासोबत काशीला गेले होते. विशाल हे दीर्घकाळापासून गंभीर आजारांनी त्रस्त होते. मुंबई, दिल्ली आणि नागपूरसह अनेक शहरांमध्ये उपचार घेऊनही त्यांच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा झाली नव्हती.
वडिलांची देवदर्शन करण्याची होती इच्छा
श्रावण महिन्यात काशी विश्वनाथ मंदिराचे दर्शन घ्यावे, अशी विशाल यांची इच्छा होती. त्यानुसार ईशानने प्रवासाची व्यवस्था केली. हे कुटुंब 5 ऑगस्ट रोजी मुंबईहून निघाले होते. ते 7 ऑगस्टला वाराणसीत पोहोचले होते. त्यांनी लक्सा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका होमस्टेमध्ये मुक्काम केला होता. काशी विश्वनाथ मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी गंगा आरती आणि विविध घाटांनाही भेट दिली होती.
अन् डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले
पुढे 9 ऑगस्टच्या रात्री विशाल यांची प्रकृती अचानक खालावली. हॉटेल कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांना बीएचयू ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर कुटुंबीयांच्या संमतीने हरिश्चंद्र घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
ते खोलीबाहेर आलेच नाहीत
अंत्यसंस्कारानंतर जया आणि ईशान हॉटेलमध्ये परतले. त्यानंतर ते खोलीबाहेर आलेच नाहीत. हॉटेल कर्मचाऱ्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रतिसाद न मिळाल्याने तशी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी खोली उघडली असता दोघेही मृतावस्थेत आढळले.
प्राथमिक तपासात खोलीत अॅल्युमिनियम फॉस्फाइडचे अंश आढळल्याचे सांगण्यात आले आहे. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत. विशाल यांच्या मृत्यूच्या धक्क्यातून हे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.
Leave a Reply