
पश्चिम बंगालमधून मोठी बातमी समोर आली आहे. दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील फलता येथे मतदानादरम्यान झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने फलता विधानसभा मतदारसंघातील 29 एप्रिल रोजी झालेले मतदान स्थगित करण्याची घोषणा केली आहे. आता या मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर 21 मे रोजी पुन्हा मतदान होणार आहे, या निवडणुकीचा निकाल 24 मे रोजी जाहीर होणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून
21 मे रोजी फेरमतदान
निवडणूक आयोगाने फलता येथे फेरमतदान घेण्याची घोषणा केली आहे. याबाबत जारी केलेल्या निवेदनात आयोगाने म्हटले की, 29 एप्रिल 2026 रोजी पश्चिम बंगालमधील फलता विधानसभा क्षेत्रातील अनेक मतदान केंद्रांवर गंभीर निवडणूक गैरप्रकार आणि लोकशाही प्रक्रियेत हस्तक्षेप झाल्याच्या घटना घडल्या होत्या. आता सहाय्यक मतदान केंद्रांसह सर्व 285 मतदान केंद्रांवर नव्याने मतदान घेतले जाणार आहे. 21 मे 2026 रोजी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळेत पुन्हा मतदान होईल आणि 24 मे रोजी मतमोजणी होईल.
मतदानाच्या दिवशी गोंधळाचे आरोप
पश्चिम बंगालमधील 294 जागांसाठी 23 एप्रिल आणि 29 एप्रिल रोजी दोन टप्प्यांत मतदान झाले होते. 29 एप्रिल रोजी फलता मतदारसंघात मतदानादरम्यान EVM मध्ये छेडछाड आणि टेप लावल्याचे प्रकार समोर आले होते. यावरून निवडणूक आयोगाने चौकशीचे आदेश दिले होते. चौकशी अहवालानंतर आयोगाने फलता मतदारसंघातील मतदान स्थगित करण्याचा निर्णय घेतला असून आता या ठिकाणी पुन्हा मतदान होणार आहे.
याआधीही झाले फेरमतदान
दरम्यान, राज्यात 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. राज्यातील उर्वरित 293 जागांचीच मतमोजणी 4 मे रोजी होईल. फलता मतदारसंघासाठी 21 मे रोजी पुन्हा मतदान घेतले जाईल आणि त्यानंतर निकाल जाहीर केला जाईल. याआधी शुक्रवारी आयोगाने दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील डायमंड हार्बर आणि मगराहाट पश्चिम या दोन विधानसभा क्षेत्रांतील 15 मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान होणार असल्याची घोषणा केली होती. आज या दोन्ही क्षेत्रांत पुनर्मतदान झाले आहे. याचा निकाल 4 तारखेला जाहीर होणार आहे.
Leave a Reply