
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा 9 वा दिवस असून, त्यांची प्रकृती खालावली आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्यामुळे राज्यभरात मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. मात्र अजूनही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा निघू शकलेला नाहीये, सरकार दरबारी हालचालींना वेग आला आहे. तीन दिवसांपूर्वी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती, सरकारला तुमच्या सर्व अटी मान्य असल्याचं त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना म्हटलं होतं, तसेच तुम्ही उपोषण सोडावं अशी विनंती देखील त्यांना केली होती. मात्र आधी हैदराबाद गॅझेट प्रमाणे प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात करा, नंतर उपोषणाचं बघू असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं.
मात्र आता अंतरवाली सराटीमधून मोठी बातमी समोर येत आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवाली सराटीमध्ये गेल्या 9 दिवसापासून निर्णायक आमरण उपोषण सुरू आहे, अशातच दुसरीकडे अचानक ओबीसी आंदोलक मंगेश ससाने हे देखील आता उपोषणाला बसले आहेत, मंगेश ससाने यांनी आपलं लाक्षणिक उपोषण सुरू केलं असल्याने या उपोषण स्थळावर आता पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. एकाच गावात 2 उपोषण सुरु झाल्याने जालना जिल्ह्यात आंदोलनाचं वातावरण आणखी तापताना पाहायला मिळतंय. काही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांनी देखील खबरदारी घेतली आहे, दरम्यान आता काहीही झालं तरी या ठिकाणावरून आम्ही उठणार नाही असा आक्रमक पवित्रा मंगेश ससाने यांनी घेतला आहे.
एकीकडे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे, तर दुसरीकडे आता मंगेश ससाणे यांनी देखील उपोषण सुरू केल्यामुळे सर्व राज्याचं लक्ष आता अंतरवाली सराटीकडे लागलं आहे. ओबीसी समाजाने देखील आता आक्रमक भूमिता घेतली आहे.
Leave a Reply