
मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांना दररोज रक्तातील साखरेची पातळी तपासण्यासाठी बोटाला सुई टोचून रक्ताचे नमुने द्यावे लागतात. ही प्रक्रिया केवळ वेदनादायी नसते तर ती अनेकांनी त्रासदायकही ठरते. मात्र आता मधुमेह (Diabetes) असलेल्या रुग्णांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता मधुमेहींच्या रुग्णांना रक्तातील साखरेची तपासणी करण्यासाठी प्रत्येक वेळी सुई टोचून रक्त काढण्याची गरज पडणार नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या संशोधकांनी एक असे उपकरण तयार केले आहे, ज्याद्वारे फक्त श्वास घेऊन मधुमेहाची पातळी तपासता येणार आहे.
नवीन तंत्रज्ञान काय?
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्राणिशास्त्र विभागातील संशोधकांनी एक ‘नॉन-इनवेसिव्ह’ (Non-invasive) प्रणाली विकसित केली आहे. ज्याद्वारे आता सुईचा वापर न करता, केवळ श्वासाच्या आधारे रक्तातील साखरेचे नेमके प्रमाण मोजणे शक्य होणार आहे. हे उपकरण श्वासातील घटकांचे विश्लेषण करते आणि त्यावरून रक्तातील साखरेचे प्रमाण किती आहे, हे अचूकपणे सांगते. या उपकरणाला आता ‘यूके डिझाईन’चे अधिकृत नोंदणी प्रमाणपत्र मिळाले आहे, ज्यामुळे या संशोधनाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे.
हे संशोधन आरोग्य क्षेत्रात एक मोठे पाऊल मानले जात आहे. या संशोधनामुळे भविष्यात लाखो मधुमेही रुग्णांना दररोज टोचल्या जाणाऱ्या सुईपासून मुक्ती मिळणार असून मधुमेह नियंत्रणाची प्रक्रिया अधिक सुलभ, स्वस्त आणि वेदनामुक्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हे संशोधन पूर्ण करण्यासाठी अनेक तज्ज्ञांनी मेहनत घेतली आहे. यामध्ये प्राणिशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. वर्षा धुर्वे, हर्ष तिवारी आणि सबरीन बानो यांचा मुख्य वाटा आहे. त्यांना मदत म्हणून डॉ. दुर्गेश आगासे, डॉ. रश्मी उरकुडे, डॉ. अंकित काळे, डॉ. तनुश्री आगासे आणि आयरलंडमधील इरा उरकुडे यांनी मार्गदर्शन केले. हे केवळ एका विद्यापीठाचे संशोधन नसून विविध संस्था आणि देशांतील तज्ज्ञांच्या एकत्रित प्रयत्नांचे फळ आहे.
आता पुढे काय?
सध्या हे उपकरण अधिक अचूक आणि खात्रीशीर बनवण्यासाठी त्यावर चाचण्या (Calibration and Validation) सुरू आहेत. एकदा का सर्व चाचण्या पूर्ण झाल्या की, हे उपकरण बाजारात येईल. यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना दररोज होणारा त्रास वाचेल आणि घरी बसून किंवा डॉक्टरकडे न जाताही साधी चाचणी करणे शक्य होईल. आविष्कार संशोधन महोत्सवामध्ये या प्रकल्पाचे खूप कौतुक झाले होते. यासाठी हर्ष तिवारी यांना पुरस्कारही मिळाला होता.
Leave a Reply