
बॉक्स ऑफिसवर सध्या 'आवारापन 2' आणि 'बंटवारा 1947' या चित्रपटांची जोरदार चर्चा आहे. पण दोघांच्या चर्चेदरम्यान हळूच एक असा चित्रपट प्रदर्शित झाला आहे, ज्याने रिलीजच्या अवघ्या चार दिवसांत जगभरात 150 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. कौटुंबिक नातेसंबंध, प्रेम आणि भावनिक संघर्षाची कथा असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय.
या चित्रपटाची सुरुवातच सकारात्मक झाली. भारतातील बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी या चित्रपटाने 15.35 कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी कमाईत मोठी वाढ झाली. हा आकडा 22.25 कोटी रुपयांवर पोहोचला. तर तिसऱ्या दिवशीही प्रेक्षकांचा प्रतिसाद कायम राहिला.
चार दिवसांत या चित्रपटाने भारतात 65.95 नेट कलेक्शन आणि 76.27 कोटी रुपये ग्रॉस कलेक्शन केलं. वेंकी अटुलुरी दिग्दर्शित या चित्रपटात सूर्याची मुख्य भूमिका आहे. लग्नापासून दूर राहण्याचा निर्णय घेतलेल्या संजयच्या आयुष्यात कुटुंबाच्या दबावामुळे मोठा बदल घडतो. सरोगसीच्या माध्यमातून तो एका मुलाचा बाप बनतो. त्यानंतर मुलाच्या आयुष्यात निर्माण होणाऱ्या गंभीर आरोग्याच्या समस्यांमुळे त्याची भेट ममिता बैजूने साकारलेल्या मॅडीशी होते.
या चित्रपटाचं नाव आहे 'विश्वनाथ अँड सन्स'. यामध्ये सूर्यासोबत ममिता बैजू, राधिका सरथकुमार आणि रवीना टंडन यांच्या भूमिका आहेत. तमिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात चांगली पकड घेतली आहे. आता आगामी दिवसांत हा चित्रपट किती मोठा आकडा गाठतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
'विश्वनाथ अँड सन्स' हा चित्रपट आता सूर्याच्या 'करुप्पू' या चित्रपटाचा लाइफटाइम कलेक्शन पार करतो का, याकडेही चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 'करुप्पू'ने बॉक्स ऑफिसवर 300 कोटी रुपयांची कमाई केली होती.





Leave a Reply