
फक्त दहा कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या 'वाझा 2' या मल्याळम भाषेतील कॉमेडी चित्रपटाने अवघ्या 14 दिवसांत विक्रमी कमाई करून सर्वांना चकीत केलं आहे. यामुळे हा दाक्षिणात्य चित्रपट बॉलिवूडच्या 'धुरंधर 2'पेक्षाही मोठा ब्लॉकबस्टर ठरला आहे.
'वाझा 2'चं दिग्दर्शन विपिन दास यांनी केलं असून थिएटरमध्ये हा चित्रपट सध्या प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करत आहे. फक्त देशातच नाही तर जागतिक स्तरावरही या चित्रपटाने आपली छाप सोडली आहे. प्रेक्षक आणि समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने 'वाझा 2' हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
या चित्रपटाने अवघ्या 14 दिवसांत 180 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. अवघ्या दहा कोटी रुपयांच्या बजेटमध्ये या चित्रपटाने 18 पट अधिक कमाई करून सर्वांना आश्चर्यचकीत केलं आहे. 'सॅकनिल्क'च्या रिपोर्टनुसार, 'वाझा 2'चा गुंतवणुकीवरील परतावा (ROI) हा 725 टक्के असल्याचा अंदाज आहे. रणवीरच्या 'धुरंधर 2'पेक्षा हा बराच जास्त आहे.
'वाझा 2' हा चित्रपट 'धुरंधर 2'पेक्षाही मोठा ब्लॉकबस्टर ठरला आहे. देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 90 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. लवकरच हा चित्रपट 100 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडू शकतो.
या दमदार कामगिरीमुळे 'वाझा 2'ने मल्याळम चित्रपटसृष्टीतील या वर्षातील सर्वांत यशस्वी चित्रपटांच्या यादीत अव्वल स्थान पटकावलं आहे. येत्या काळात हा चित्रपट 'लोका: चाप्टर 1'चाही विक्रम मोडू शकतो, असा अंदाज आहे.




Leave a Reply