
बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल केलेल्या एका विधानामुळे महाराष्ट्रात नव्या वादाला तोंड फुटले आहे. शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांच्यात गुरु-शिष्याचे नाते असल्याचा दावा करत धीरेंद्र शास्त्री यांनी एक किस्सा सांगितला होता. या विधानावर शिवप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त होत असतानाच, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावरून राज्य सरकार आणि भाजपवर घणाघाती टीका केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी त्यांना रोखायला हवे होते – संजय राऊत
या प्रकरणावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, “राज्याचे मुख्यमंत्री आणि सरसंघचालक या दोन प्रमुख व्यक्तींच्या उपस्थितीत अशा प्रकारे इतिहासाची मोडतोड केली जात असेल, तर ते दुर्दैवी आहे. शिवाजी महाराज हा आपल्या ऊर्जेचा आणि शौर्याचा अखंड प्रवाह आहे. अशा तरुण बाबांना छत्रपतींच्या इतिहासाचे भान नाही. जेव्हा ते चुकीचा इतिहास सांगत होते, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी किंवा सरसंघचालकांनी त्यांना वेळीच रोखून महाराष्ट्राच्या भावनांची जाणीव करून द्यायला हवी होती.”
लोकसंख्या वाढीच्या विधानावरून टोला
धीरेंद्र शास्त्री यांनी ‘चार मुले जन्माला घाला’ असे जे विधान केले, त्यावरही संजय राऊतांनी कडक शब्दांत टीका केली. जे स्वतः ब्रह्मचारी आहेत, त्यांनी दुसऱ्यांना मुले जन्माला घालण्याचा सल्ला देणे हास्यास्पद आहे. एका बाजूला सरकार लोकसंख्या नियंत्रणासाठी कोट्यवधी रुपये खर्च करते आणि दुसरीकडे असे विचार मांडले जातात. त्यांनी मुलांना सैन्यात पाठवण्याचे आवाहन का केले नाही?” असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
शिवरायांचा अपमान सहन करणार नाही
छत्रपती शिवाजी महाराजांना ‘थकलेला माणूस’ संबोधल्याच्या मुद्द्यावरूनही राऊतांनी संताप व्यक्त केला. “असा अपमान जर दुसऱ्या कोणी केला असता, तर हे लोक रस्त्यावर उतरले असते. पण आता सत्ताधाऱ्यांच्या संवेदना मेलेल्या आहेत, त्यांना छत्रपतींविषयी प्रेम उरलेले नाही,” अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
Leave a Reply