
भारतीय संस्कृतीत तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक हिंदू घराच्या अंगणात किंवा गॅलरीत तुळशीचे रोप असतेच. मात्र, अनेकदा काळजी घेऊनही तुळस सुकू लागते, पाने पिवळी पडतात किंवा त्यावर पांढरी जाळी येते.
कृषी तज्ज्ञांच्या मते, तुळस सुकण्यामागे प्रामुख्याने चार कारणे असतात. कुंडीत गरजेपेक्षा जास्त पाणी साचणे, झाडाला पुरेसा सूर्यप्रकाश न मिळणे, हवेतील अति ओलावा किंवा खेळत्या हवेचा अभाव, मावा आणि कोळी यांसारख्या कीटकांमुळे होणारा संसर्ग यामुळे तुळस सुकते.
जर तुमच्या तुळशीची पाने पिवळी पडत असतील किंवा त्यावर पांढरी जाळी दिसत असेल, तर महागडी औषधे आणण्यापेक्षा आपल्या स्वयंपाकघरातील काही गोष्टी वापरून आपण हे रोप पुन्हा हिरवेगार करू शकतो.
जर पानांवर बारीक कीड दिसत असेल, तर कडुलिंबाची पाने पाण्यात उकळून ते पाणी थंड करा आणि झाडावर फवारा. हे नैसर्गिक कीटकनाशक झाडाला कोणतीही इजा न पोहोचवता कीड नष्ट करते. हळद ही अँटी-बॅक्टेरियल असते. कुंडीतील मातीत बुरशी लागू नये म्हणून दर पंधरा दिवसांनी थोडी हळद मातीत मिसळावी. यामुळे झाडाची मुळे मजबूत होतात.
जर कीड जास्त प्रमाणात असेल तर लसूण आणि हिरवी मिरची वाटून त्याचे गाळलेले पाणी झाडावर फवारावे. याच्या वासामुळे कीटक लगेच पळून जातात. जुन्या काळापासून तुळशीवर लाकडाची राख शिंपडण्याची पद्धत आहे. राख केवळ कीड दूर ठेवत नाही, तर मातीतील ओलावा संतुलित राखण्यासही मदत करते.
रोपाची कीड गेल्यानंतर त्याला ताकद मिळण्यासाठी थोडे शेणखत किंवा गांडूळ खत द्यावे. तुळशीला दिवसातून किमान ४ ते ५ तास कोवळे ऊन मिळेल याची काळजी घ्यावी. तसेच, कुंडीतील माती वरून कोरडी झाल्याशिवाय पुन्हा पाणी देऊ नये. या छोट्या बदलांमुळे तुमची तुळस वर्षभर टवटवीत आणि सुगंधित राहील.





Leave a Reply