
बँकिंग व्यवहार अधिक सुरक्षित आणि जलद करण्यासाठी 1 जानेवारी 2027 पासून चेकबुकवर अल्फान्यूमेरिक कोड असणे अनिवार्य करण्यात आले आहेत. ग्राहकांना त्यांचे चेकबुक बदलण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत आहे. अनेक बँकांनी नवीन चेकबुक देण्यास आधीच सुरुवात केली आहे, तर इतर बँका लवकरच ही प्रक्रिया सुरू करतील. चला तर मग बँकेच्या या नव्या नियमांबद्दल जाणून घेऊयात.
तुमचे चेकबुक लवकरच बदलून घ्या
नवीन नियमांनुसार बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना सांगितले आहे की, 31 डिसेंबर 2026 नंतर चेकवर अल्फा-न्यूमेरिक कोड नसल्यास 50 हजार रूपये आणि त्यावरील रकमेचे चेक स्वीकारले जाणार नाहीत. बँकेने ग्राहकांना लवकरात लवकर नवीन चेकबुकसाठी अर्ज करण्याचा सल्ला दिला आहे, जेणेकरून पैसे भरताना कोणतीही अडचण येणार नाही. त्याचप्रमाणे इतर सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँकांनीही अल्फा-न्यूमेरिक कोड असलेली चेकबुक जारी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. बँका ग्राहकांना ईमेल आणि एसएमएसद्वारे नवीन चेकबुक मिळवण्याबद्दल माहिती देत आहेत.
नवीन चेकबुकसाठी बँकेनुसार शुल्क वेगळे
नवीन चेकबुक घेण्यासाठी ग्राहकांना बँक आणि खात्याच्या प्रकारानुसार वेगवेगळे शुल्क द्यावे लागू शकते. जसे की, बँक ऑफ इंडिया बचत खातेदारांना वर्षातून एकदा 25 पानांचे चेकबुक मोफत देते. त्यानंतरच्या चेकबुकसाठी प्रत्येक चेकबुक मागे 5 रुपये शुल्क आकारले जाते.
मात्र, इतर बँकांमध्ये चेकबुकचे शुल्क आणि मोफत चेकबुकची मर्यादा वेगळी असू शकते. त्यामुळे नवीन चेकबुक घेण्यापूर्वी आपल्या बँकेचे लागू शुल्क तपासणे महत्त्वाचे आहे.
चेक सेटलमेंटसाठी लागणारा वेळ कमी होईल
आरबीआय चेक क्लिअरिंग प्रणाली अधिक जलद आणि सुरक्षित करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. चेक ट्रंकेशन आणि कंटिन्युअस क्लिअरिंगमुळे पैसे देणाऱ्या शाखेकडे पाठवल्या जाणाऱ्या कागदी चेक्सची संख्या कमी झाली आहे, ज्यामुळे चेक क्लिअरिंगचा वेळ कमी झाला आहे. ट्रंकेशन हे चेक क्लिअरिंग प्रणालीचेच एक स्वरूप आहे. याद्वारे प्रत्यक्ष कागदी चेक्सचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रूपांतर केले जाते. चेकवर नमूद केलेल्या रकमेसाठी डिजिटल चेक पैसे देणाऱ्या बँकेकडे पाठवण्यासाठी या प्रक्रियेचा वापर केला जातो. या प्रणालीमुळे चेक क्लिअरिंगचा वेळ लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.
अल्फा-न्यूमेरिक कोड म्हणजे काय?
अल्फा-न्यूमेरिक कोड म्हणजे अक्षरे आणि अंक यांचे मिश्रण असलेला विशेष कोड. चेकवर असा कोड असल्यास त्याची ओळख आणि पडताळणी अधिक अचूकपणे करता येते. यामुळे चेकमध्ये फेरफार करणे, बनावट चेक तयार करणे किंवा चुकीच्या पद्धतीने पैसे काढण्याचा धोका कमी करण्यास मदत होते. त्यामुळे बँकिंग व्यवहार अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने अशा कोडचा वापर केला जातो.
Leave a Reply