
नाशिकमधील खड्ड्यांच्या मुद्द्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी संताप व्यक्त केला. यादरम्यान त्यांनी मंत्री गिरीश महाजन /यांचेही नाव घेतले. छगन भुजबळ यांनी नाशिकमधील खड्ड्यांमुळे होणाऱ्या मृत्यूवर संताप व्यक्त केला. छगन भुजबळ म्हणाले की, हे आमच्या मुळावर येत आहे. याकडे कोणी काही लक्षच देत नाहीये. नाशिकला येवढे खड्डे आणि नाशिक एवढे बेकार कधीच नव्हते. त्यादिवशी मी एका लग्नाला गेलो होतो, प्रचंड खड्डे. यामुळे वाहतूक धिम्म्या गतीने होते, वाहतूककोंडी. पोलिस तरी काय करतील? नगरसेवक स्वत: वैतागलेले आहेत. महापाैर काही करू शकत नाहीत. मग हे शहर काही वाऱ्यावर सोडले आहे का. नाशिकच्या खड्ड्यांच्या मुद्द्यात छगन भुजबळ आक्रमक भूमिका घेताना दिसले. त्यांनी म्हटले की, माझे या सगळ्या लोकांना सांगणे आहे की, ताबडतोब कारवाई करा, अथवा मी या सर्व गोष्टी मंत्रिमंडळात किंवा मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडणार.
पण याला जबाबदार असणारे जे लोक आहेत, त्यांनी याच्यामध्ये ताबडतोब लक्ष दिले पाहिजे. जरा पाऊस ओरसला की, ते खड्डे भरले पाहिजेत. ठीक आहे… परत होईल खड्डा होऊ द्या, परत भरा. माणसं मरण्यापेक्षा डबल काम झाले तरीही काही हरकत नाही. एका मृत्यूसाठी त्यांनी 10 लाख रूपये दिल्याचे कळले. कुंभमेळा नाशकात होतोय, मंत्री महाजनांनी तरी लक्ष द्यावं.
माझं म्हणणं आहे की, जेवढे लोक मृत्यूमुखी पडले आहेत, ते शासनाच्या महापालिका यांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. एकाला जसा न्याय दिला तशीच रक्कम सर्वांना दिली पाहिजे. मंत्री गिरीश महाजनांनी याकडे लक्ष दिले पाहिजे. जबाबदारी एकमेकांवर ढकलून चालणार नाही. नाशिकचे नाव खराब करण्याचे काम सुरू आहे. नाशिकच्या रस्त्यांवर फिरा, तिथे काय आहे हे लक्षात येईल.
अधिकारी फक्त काय ऑफिसमध्ये बसण्यासाठी नाहीत. कुंभमेळा असो किंवा काही पण शेवटी प्रत्येक गोष्टीची जबाबदारी हे महापालिकेवरच आहे. रस्त्याची असेल, पाण्याची असेल किंवा बांधकामाची तर ही महापालिकेचीच जबाबदारी आहे. माझं काम नाही, त्याचं काम आहे असे म्हणून चालणार नाही, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.
Leave a Reply