
केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणी मोठी अपडेट हाती आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयलची पॉलिग्राफ चाचणी करण्यासाठी पुणे पोलिसांनी कोर्टात अर्ज दाखल केला आहे. आतापर्यंत या प्रकरणात कोणतेही महत्त्वाचे पुरावे आढळले नाही. केतन अग्रवालला नेमकं कुणी ढकललं, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे केतनला कोणी ढकललं, याची सत्यता पडताळण्यासाठी पुणे पोलिसांनी पॉलिग्राफ चाचणीची मागणी केली आहे.
तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात सांगितलं की, मुख्य आरोपी सिया गोयल आणि सहआरोपी चेतन चौधरी यांचा जबाब नोंदवला आहे. या हत्याकांडातील संपूर्ण सत्य समोर आणण्यासाठी पोलिसांनी पॉलिग्राफ टेस्टची (Polygraph Test) मागणी केली आहे. पोलिग्राफ टेस्टच्या माध्यमातून या प्रकरणी नवी माहिती मिळू शकते, असा पोलिसांचा दावा आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, तपास अधिकारी आता या चाचणीकडे अतिरिक्त साधन म्हणून पाहत आहे. सध्याच्या तपासामुळे घटनेचा संपूर्ण क्रम स्पष्ट होत नाहीये. परंतु पॉलिग्राफ चाचणीचा अहवाल हा कोर्टात मुख्य पुरावा म्हणून गृहीत धरला जात नाही. परंतु तपास यंत्रणाकडून चाचणीचा वापर हा नवीन धागेदारे मिळवणे आणि नवीन दिशा ठरवण्यासाठी केला जातो. त्यामुळे कोर्टाने पॉलिग्राफ चाचणीला मंजुरी दिल्यानंतर पोलिसांना तपासात नवीन माहिती मिळू शकते. आता कोर्ट पोलिसांना मंजुरी देणार का, हे पाहावे लागेल.
पुणे पोलिसांचा 3 ठिकाणी पंचनामा
पुण्यातील तीन ठिकाणी पुणे ग्रामीण पोलिसांचे पथक आज मुख्य आरोपी सिया गोयलला पंचनामा करण्यासाठी घेऊन आले होते. केतन अग्रवाल हत्या प्रकरणात अटक असलेली आरोपी सिया गोयलला घेऊन आज पुणे ग्रामीण पोलिसांनी घटनेपूर्वी आणि घटनेनंतर सियाने ज्या ज्या ठिकाणावर गेली होती, तिथे पोलिसांनी पंचनामा केलाय. यासह घटनेच्या दिवशी सियाने परिधान केलेले कपडेसुद्धा ग्रामीण पोलिसांनी जप्त केलेत. तसेच सिया आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरीने ज्या ठिकाणी केतनला मारण्यासाठी सराव केला होता, तिथे सुद्धा भेट दिली आणि पंचनामा केलाय.
Leave a Reply