
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा 2026 या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. डकैत, भूत बंगला यांसारखे इतर चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाले, परंतु ‘धुरंधर 2’च्या कमाईवर त्याचा कोणताच परिणाम झाला नाही. रणवीर सिंहच्या या चित्रपटाच्या कमाईच्या वेगाला कोणीच रोखू शकलं नाही. आता प्रदर्शनाच्या एक महिन्यानंतरही हा चित्रपट कोट्यवधींचा गल्ला जमवत आहे. इतकंच नव्हे तर या चित्रपटाने जगभरात तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ‘पुष्पा 2: द रुल’लाही मागे टाकलं आहे. आता ‘धुरंधर 2’चं पुढचं लक्ष्य आमिर खानचा ‘दंगल’ असणार आहे.
‘पुष्पा 2’चा विक्रम मोडला
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ या चित्रपटाने जगभरात तब्बल 1747 कोटी रुपयांची कमाई केली होती. हाच रेकॉर्ड आता ‘धुरंधर 2’ने मात्र अवघ्या एका महिन्यात मोडला आहे. ‘बॉलिवूड हंगामा’ने दिलेल्या वृत्तानुसार, जगभरातील ‘धुरंधर 2’च्या कमाईचा आकडा 1778.25 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या चित्रपटाने परदेशात 452.6 कोटी रुपये कमावले आहेत. कोणत्याही हिंदी चित्रपटासाठी ही खूप मोठी बाब आहे. तर भारतातील ग्रॉस कलेक्शनचा आकडा 1335.54 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर नेट कलेक्शन 1115 कोटी रुपये इतकं झालं आहे.
‘दंगल’चा रेकॉर्ड मोडणार का?
विशेष म्हणजे आखाती देशांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला नसला तरी बॉक्स ऑफिसवरील कमाईवर त्याचा फारसा फरक पडलेला नाही. या चित्रपटावर पाकिस्तानमध्येही बंदी आहे. आता ‘धुरंधर 2’पुढे आमिर खानच्या ‘दंगल’चं आव्हान आहे. या चित्रपटाने जगभरात 2000 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.
ओटीटीवर कधी येणार?
आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधी प्रदर्शित होईल, याची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. ‘धुरंधर’चा पहिला भाग जरी नेटफ्लिक्सवर स्ट्रीम झाला असला तरी आता दुसरा भाग त्याच ओटीटीवर प्रदर्शित होणार नाही. ‘धुरंधर 2’ हा चित्रपट जिओ हॉटस्टारवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘धुरंधर 2’ हा चित्रपट येत्या 14 मे रोजी जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम होणार आहे. थिएटरमधील प्रदर्शनाला 60 दिवस पूर्ण होण्याआधीच हा ब्लॉकबस्टर चित्रपट ओटीटीवर येणार असल्याचं कळतंय. ‘स्ट्रीम जेनएक्स’वर ओटीटी प्रदर्शनाबाबत दिलेल्या माहितीला अद्याप जिओ हॉटस्टारकडून कोणताही दुजोरा देण्यात आला नाही. ब्लॉकबस्टर बॉलिवूड चित्रपटांसाठी सर्वसाधारणपणे आठ आठवड्यांचा कालावधी पाळला जातो. त्यानंतरच तो ओटीटीवर स्ट्रीम होतो.
Leave a Reply