
मिरा रोडच्या नयानगरमध्ये एका वॉचमनवर चाकू हल्ला करणाऱ्या जैब जुबैरच्या चांगल्याच मुसक्या आवळल्या गेल्या आहेत. धर्म विचारून हल्ला केल्याने या प्रकरणाचं गांभीर्य अधिकच वाढलं आहे. पहलगाम हल्ल्यासारखं तर हे प्रकरण नाही ना? यासाठी दहशतवाद विरोधी पथक आणि एटीएसकडून या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे. एटीएसने जैबच्या घराची झाडाझडती घेतली. यावेळी त्यांना धक्कादायक गोष्टी आढळून आल्या आहेत. पोलिसांना एक नोट सापडली असून त्यावर त्याने धक्कादायक शपथ घेतल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे जैबचा नेमका हेतू काय होता? याचा शोध घेतला जात आहे.
मीरा रोड चाकू हल्ला प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. एटीएस सूत्रांनुसार मीरा रोडच्या नया नगर परिसरात दोन सिक्युरिटी गार्डवर हल्ला केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या जैब जुबेर अन्सारीने स्वतःचा मोबाईल फॉरमॅट केला होता. तपास यंत्रणांच्या नजरेसमोर पुरावे जाऊ नयेत आणि डेटा नष्ट व्हावा यासाठी त्याने मोबाईल फॉरमॅट केल्याचा संशय आहे. आरोपीने दुसरा मोबाईल कुठेतरी फेकून दिल्याची माहिती समोर आली असून एटीएस त्याचा शोध घेत आहे.
काय घेतली शपथ?
एटीएसने त्याच्या घरातून त्याने लिहिलेल्या काही नोट जप्त केल्या आहेत. त्यात त्याने आयसीसच्या प्रति बैयत म्हणजेच शपथ लिहिली होती. जैब जुबेर अन्सारीने लोन वुल्फ हल्ल्याचा उल्लेख करत लिहिलेल्या शपथेत “आम्ही अल्लाहकडे दुआ करतो की तो सर्व मुस्लिमांना योग्य मार्ग दाखवो आणि तरुणांना सांगतो की त्यांनी कुटुंबाची चिंता न करता इस्लामिक स्टेटमध्ये सहभागी व्हावे. अल्लाह त्यांना एक दिवस मार्ग दाखवेल. आज ते समजत नाहीत,” असं म्हटलं आहे.
“आज आम्ही एकटे आहोत आणि सर्वांनी आम्हाला नाकारले आहे, पण आम्ही ‘गुरबा’ ( एकटे पडलेले लोक) आहोत. कुटुंब, पत्नी, आई-वडील तुम्हाला सोडून देतील. अल्लाह त्यांना योग्य मार्ग दाखवो. गाझा फक्त खिलाफतद्वारेच मुक्त होईल! अल्लाहनंतर खिलाफत हीच एकमेव आशा आहे,” असंही त्याने या शपथेत म्हटलं आहे. हा सगळा आक्षेपार्ह मजकूर त्याने एका कागदावर लिहून ठेवल्याचे एटीएस सूत्रानी सांगितले.
दरम्यान, जैबला ठाणे न्यायालयाने 4 मेपर्यंतची एटीएस कोठडी सुनावली आहे. एटीएसने त्याच्या घरी धाड मारली होती. त्यावेळी त्याच्या घरातून ‘लोन वुल्फ’ हल्ले आणि ‘इस्लामिक स्टेट’ संदर्भातील चिठ्ठी जप्त करण्यात आली आहे. याशिवाय लॅपटॉप, मोबाईल, पेन ड्राइव्हसह संशयास्पद साहित्य पोलिसांच्या हाती लागले आहे. हे सर्व साहित्य महाराष्ट्र एटीएसकडून ठाणे एटीएसकडे तपास हस्तांतरित करण्यात आलं आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने अवघ्या दीड तासात आरोपीला अटक करण्यात आली होती. आरोपी पूर्वी अमेरिकेत वास्तव्यास होता. त्याची पत्नी अफगाण वंशाची आहे. त्याचा दहशतवाद्यांशी काही संबंध होता का? याचा शोध घेतला जात आहे. त्याची मुंबई-ठाण्यातील लिंक शोधली जात आहे.
Leave a Reply