
Narendra Modi Speech : महिलांचे आरक्षण मतदारसंघांच्या फेररचनेशी जोडणाऱ्या नारीशक्ती वंदन घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करून घेण्यासाठी तीन दिवसीय विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात विधेयकावर सखोल चर्चा केली जात आहे. विरोधकांनी या विधेयकावर काही आक्षेप नोंदवले आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत या विधेयकाची भूमिका, विधेयकात काय तरतूद असेल? तसेच या विधेयकामुळे नेमके काय होणार? याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी विरोधकाना मोलाच सल्ला दिला. या विधेयकाला विरोधकांनी विरोध करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
हा निर्णय 25 ते 30 वर्षांपूर्वीच व्हायला हवा होता
आपण सगळे जण मिळून देशाला एका वेगळ्या दिशेने घेऊन जात आहोत. महिला आरक्षणाचा हा निर्णय 25 ते 30 वर्षांपूर्वीच व्हायला हवा होता. परंतु तरीदेखील आता जो निर्णय घेतला जात आहे, त्यामुळे देशाला एक वेगळी दिशा मिळणार आहे. या निर्णयाला अगोदरच विरोध झालेला आहे, असे मत नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
विरोधकांनी चूक करू नये, अन्यथा…
तसेच पुढे बोलताना हे विधेयक मांडताना आम्ही विरोधी पक्षांशी चर्चा केली आहे. कोणत्याही पक्षाने या विधेयकाला तत्त्वत: विरोध केलेला नाही, असेही मोदी यांनी सांगितले. विरोधकांना मला एक मैत्रीपूर्ण सल्ला द्यायचा आहे, असे म्हणत त्यांनी महिला मतांच्या ताकदीविषयी भाष्य केले. विरोधकांनी महिलांच्या ताकदीला ओळखावे. आतपर्यंत ज्याने कोणी महिलांना विरोध केला आहे, त्याला महिलांनी उत्तर दिले आहे. त्यामुळे विरोधकांनी या विधेयकाला विरोध करण्याची चूक करू नये, असा खोचक सल्ला मोदी यांनी विरोधकांना दिला.
आमचा विधेयकामागे कोणताही स्वार्थ नाही
पुढे बोलताना या विधायकामागे आमचा कोणताही स्वार्थ नाही. आम्हाला या विधेयकाचे श्रेय नको आहे. कोणाला या विधेयकाचे क्रेडिट घ्यायचे असेल तर त्यांनी घ्यावे, असे सांगत त्यांनी राजकीय स्वार्थ समोर ठेवून आम्ही हे विधेयक आणलेले नाही, असे मोदी यांनी सांगण्याचा प्रयत्न केला.
Leave a Reply