
अभिनेत्री ईशा कोपिकरने नीट पेपरफुटीविरोधात सीजेपीच्या आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईबद्दल अपमानास्पद भाषा वापरणाऱ्यांना विरोध केला होता. यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तिला ‘अंधभक्त’ असं म्हणत ट्रोल केलं होतं. या ट्रोलिंगवर ईशाने एक व्हिडीओ पोस्ट करून त्यावर प्रत्युत्तर दिलं होतं. आता पुन्हा एकदा इन्स्टा स्टोरीमध्ये तिने लिहिलेली पोस्ट चर्चेत आली आहे. आपली निष्ठा कोणत्याही राजकीय पक्षाशी नसून भारत आणि देशाच्या प्रगतीशी आहे, असं तिने स्पष्ट केलं.
ईशाची नवी पोस्ट-
‘अंधभक्त’वरून टीका करणाऱ्यांना ईशाने आणखी पोस्ट लिहित सडेतोड उत्तर दिलं आहे. ‘जे लोक इतरांना गोंधळात टाकण्यासाठी शब्दांचा विपर्यास करतात, त्यांना मी सांगू इच्छिते की, जर तुम्ही प्रेमात आंधळे होऊ शकता, तर तुम्ही तुमच्या देशाच्या प्रेमात आंधळे का होऊ शकत नाही? तुम्ही अंधभक्त आणि देशभक्त दोन्ही असू शकता’, असं लिहित ईशाने तिरंग्याचा इमोजीसुद्धा जोडला आहे.

काय म्हणाली होती ईशा?
“भारतावर प्रेम करणं, देशाच्या प्रगतीवर विश्वास ठेवणं आणि देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा बाळगणं याला जर ‘अंधभक्ती’ म्हटलं जात असेल, तर हा शब्द स्वीकारण्यात मला कोणतीही अडचण नाही”, असं ईशा कोपिकर म्हणाली होती. तिच्या मते देशावर प्रेम करणं म्हणजे फक्त सोशल मीडियावर देशभक्तीच्या घोषणा देणं नव्हे, तर आपल्या परीने देशासाठी योगदान देणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे देशाने आपल्याला काय दिलं, हा प्रश्न विचारण्याऐवजी आपण देशाला काय देऊ शकतो, याचा विचार करण्याची गरज असल्याचं तिने म्हटलं आहे.
ईशाच्या या पोस्टनंतर अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांनी तिचं समर्थन केलं. ईशाने आपली भूमिका योग्य पद्धतीने मांडली आहे, असं कंगना म्हणाल्या. ईशाच्या व्हिडीओमुळे आणि आता या नव्या पोस्टमुळे सोशल मीडियावर देशभक्त, अंधभक्ती आणि सेलिब्रिटींच्या राजकीय मतांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. ईशाने मात्र ट्रोलिंगला घाबरून मागे हटण्याऐवजी आपल्या मतांवर ठाम राहण्याचा संदेश दिला आहे.
Leave a Reply