
पुण्यातील पाषाण-बावधन रस्त्यावर एका भीषण अपघातात सॉफ्टवेअर इंजिनियर वीरेंद्र द्विवेदी यांचा मृत्यू झाला आहे. भरधाव वेगाने आलेल्या एका कारने नेकलेस गार्डनजवळ त्यांना धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या द्विवेदी यांना त्याच अपघातग्रस्त कारमधून रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळच्या वेळी घडली. अपघातानंतर गाडीचा चालक फरार झाला की तोच गाडीतून द्विवेदी यांना रुग्णालयात घेऊन गेला, याबाबत पोलीस तपास करत आहेत. वीरेंद्र द्विवेदी यांना धडक देणारी कार ‘ब्लू रेंज डेव्हलपर्स’ या खाजगी कंपनीच्या नावावर नोंदणीकृत आहे. या गाडीचा पत्ता अबिल हाऊस असा दाखवत आहे.
अपघातस्थळी कोणतीही सीसीटीव्ही कॅमेरा उपलब्ध नसल्यामुळे घटनेचे नेमके फुटेज मिळालेले नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला असून, गाडीचा चालक दारूच्या नशेत होता का, याचाही शोध घेतला जात आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Leave a Reply