
सोशल मीडियावर व्हायरल होणारी आकर्षक रील्स आणि प्रचंड नफ्याच्या दाव्यादरम्यान मुंबईत सायबर फसवणुकीचं एक मोठं प्रकरण उघडकीस आलं आहे. वरळीकत राहणाऱ्या एका व्यक्तीला 5 रुपयांच्या जुन्या नोटांच्या बदल्यात थेट 51 लाख रुपये मिळतील, असं आमिष दाखवण्यात आलं. तोही त्या आमिषाला भुलला आणि त्याच जाळ्यात अ़डकून त्याने लाखो रुपये गमावले. इन्स्टाग्रामवर दिसलेल्या एका जाहिरातीनंतर पीडित इसमाने आरोपींशी संपर्क साधला होता, त्यानंतर विविध शुल्क तसेच प्रोसेसिंग फीच्या नावाखाली त्याला पैसे जमा करण्यास सांगण्यात आलं. मात्र आपली फसवणूक झाल्याचं त्याला काही काळाने लक्षात आलं आणि तो हादरलाच
इन्स्टाग्राम रीलमुळे सुरू झाला खेळ
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारर, पीडित इसमान इन्स्टाग्रामवर एक रील पाहिलं होतं, 5 रुपयांच्या जुन्या नोटांच्या बदल्यात मोठी रक्कम मिळेल, असा दावा त्यात करण्यात आला होता. विशेष क्रमांक किंवा जुन्या नोटांना मोठी किंमत मिळू शकते, असं त्या जाहिरातीत नमूद करण्यात आलं होतं. याच रीलमुळे प्रभावित होऊन पीडित इसमाने तिथे देण्यात आलेल्या व्हॉटॲप नंबरच्या माध्यमातून संपर्कर साधला. त्यानंतर आरोपींनी त्याला, त्याच्याकडे असलेल्या 5 रुपयांच्या जुन्या नोटांचे फोटो पाठवण्यास सांगितलं.
52 लाखांचं दाखवलं आमिष
पीडित इसमाने 5 रुपयांच्या पाच जुन्या नोटांचे फोटो आरोपींना पाठवले. त्यानंतर कथित खरेदीदारांनी या नोटांच्या बदल्यात त्याला 51 लाख रुपये मिळू शकतात, असा दावा करत आमिष दाखवलं. त्याचा विश्वास संपादन करण्यासाठी सुरुवातीला आरोपींनी एक क्यूआर कोड पाठवला आणि प्रोसेसिंग शुल्काच्या नावाखाली 11 हजार रुपये जमा करण्यास सांगितलं. ही रक्कम जमा झाल्यानंतर त्या आरोपींनी विविध औपचारिकता आणि शुल्क यांचं कारण देत वारंवार त्याच्याकडे पैशांची मागणी केली.
एवढंच नव्हे तर मोठ्या नफ्याचं आमिष दाखवून आरोपींनी पीडित इसमाकडून अनेक वेळा पैसे घेतले. 4 जून ते 12 जून 2026 या कालावधीमध्ये आरोपींनी त्याला वेगवेगळ्या बँक अकाऊंट्समध्ये रक्कम ट्रान्स्फर करण्यास सांगितली. त्या काळात पीडित इसमाने एकूण 3 लाख 3 हजार 231 रुपये जमा केले होते. मात्र वारंवार पैसे भरूनही दावा करण्यात आलेले 51 लाख रुपये काही त्याला मिळले नाहीत आणि आपली फसवणूक झाल्याचे अखेर त्याच्या लक्षात आलं.
वरळी पोलिसांत गुन्हा दाखल
पीडित इसमाने वरळी पोलीस ठाण्यात धाव घेत सर्व प्रकार सांगितला. त्याच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. IT Act कलम 66(C), 66(D) तसेच BNS कलम 318(4), 319(2) अंतर्गत गुन्हा अंतर्गत गुन्हा दाखल करत पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आरोपींनी फसवणुकीसाठी जी बँक खाती वापरली आणि जो मोबाईल नंबर वापरण्यात आला, त्याची माहिती तपास यंत्रणा गोळा करत आहेत.
दरम्यान फेसबुक, इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जुन्या नोटा आणि नाण्यांच्या बदल्यात लाखो-कोट्यवधी रुपये मिळतील, असे जे दावे केले जातात ते बनावट असतात असं पोलिसांनी सांगितलं. सायबर ठग अशा जाहिरातींच्या माध्यमातून लोकांना पैशांच्या आमिषाने जाळ्यात ओढतात आणि त्यानंतर प्रोसेसिंग फी, जीएसटी, रजिस्ट्रेशन शुल्क किंवा इतर कारणे सांगून पैसे उकळतात. त्यामुळे सावध रहा, फसवणुकीला , आमिषांना बळी पडू नका
असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
Leave a Reply