
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 14 वा दिवस आहे. गेल्या आठवडाभरापासून सरकारचे शिष्टमंडळ आंतरवाली सराटीत फिरकलेले नाही. तर उद्या मुंबईतील धडकणाऱ्या मोर्चाविषयी जरांगे पाटील रुपरेषा मांडतील. दरम्यान आज कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके हे मनोज जरांगे पाटील यांची दुपारी भेट घेणार आहेत. भंडारा आणि महाप्रसादाविषयी अन्न आणि औषध प्रशासनानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. एमपीएससी पेपरफुटीचा मुद्दा राज्यात पेटला आहे. अनेक शहरातील परीक्षार्थी, उमेदवार रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्या आंदोलनाला काँग्रेस आणि आमदार रोहित पवार यांनी पाठिंबा दिल्याचे दिसून येत आहे. तर एमपीएससीतील परीक्षांची एसआयटी चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
हवामान खात्यानुसार आजपासून राज्यातील काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. काही तज्ज्ञांच्या मते विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रासह उर्वरीत राज्यातील काही भागात पाऊस हजेरी लावू शकतो. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये पावसाने ओढ दिल्यास मराठवाड्यावर जलसंकट आणि दुष्काळाचे सावटाची टांगती तलवार आहे.
तर दिल्लीत उद्यापासून BRICS शिखर परिषद होत आहे. या परिषदेला रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांच्यासह इतर देशातील नेतृत्व भारतात येणार आहे. 12-13 सप्टेंबर दरम्यान ब्रिक्स परिषद होईल. भारत मंडपममध्ये होणाऱ्या या परिषदेत व्लादीमीर पुतीन, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग, इराणचे राष्ट्रपती मसूज पेजेशकियन, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल रामफोसा आणि इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांचा सहभाग असेल. संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव एंटोनियो गुटेरेस हे पण सहभागी होतील .
Leave a Reply