
आयपीएल 2026 स्पर्धेचा मध्यान्ह पार पडला असून काही संघांची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जबरदस्त कामगिरी केली आहे. तर काही संघांच्या मागे पराभवाचं सावट लागलं आहे. त्यामुळे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येण्याची स्थिती आहे. असं असताना काही संघांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे हातातला सामना गमवण्याची वेळ आली आहे. क्रीडाप्रेमींनी पराभवाचं आकलन करताना उणी बाजू मांडली आहे. यात दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स संघाच्या कर्णधारांनी घेतलेले निर्णय काही क्रीडाप्रेमींच्या पचनी पडले नाहीत. दिल्ली कॅपिटल्सला तर सर्वाधिक फटका बसला आहे. तर लखनौचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येण्याचा मार्गावर आहे.
दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना पार पडला. दिल्ली कॅपिटल्सच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. पण समोर भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूडसारखे दिग्गज गोलंदाज होते. अशा स्थितीत दिल्ली कॅपिटल्सने 18 वर्षीय साहिल पारखला सलामीवीर म्हणून पाठवून एक धोका पत्करला. हा अननुभवी खेळाडू पहिल्याच सामन्यात शून्यावर बाद झाला आणि संघ दबावाखाली आला. केएल राहुलसारख्या वरिष्ठ खेळाडूने पहिला चेंडू खेळला असता, तर परिस्थिती वेगळी असती. हा चुकीचा निर्णय दिल्ली महागात पडला आणि पराभवाची धूळ खावी लागली. तसेच संघाची सातव्या स्थानी घसरण झाली आहे.
सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने 228 धावा केल्या. पण तरीही पराभवाला सामोरे जावे लागले. यामागे कर्णधार रियान परागचा निर्णय कारणीभूत असल्याचे स्पष्ट दिसते. जागतिक दर्जाचे फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई आणि रवींद्र जडेजा संघात असूनही त्यांना फक्त एकच षटक दिले. राजस्थानच्या मुख्य गोलंदाजांना बाजूला ठेवून एकाच वेळी आठ खेळाडूंसह गोलंदाजी केली. यष्टीरक्षक वगळता सर्वजण चेंडू देत असल्याचे पाहून कर्णधार गोंधळल्याचं दिसून आलं.
कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या रोमांचक सामन्यात लखनौ सुपरजायंट्सने केलेल्या चुका महागात पडल्या. सुपर ओव्हरमध्ये खराब फॉर्ममध्ये असलेल्या निकोलस पूरनला सलामीवीर म्हणून पाठवलं. किमान चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या फलंदाजाला पाठवले असते, तर निकाल अधिक चांगला लागला असता. शिवाय, त्याआधी, डावाचे शेवटचे षटक दिग्वेश राठीला देऊन त्यांना 26 धावा द्याव्या दिल्या. या छोट्या रणनीतिक चुकांमुळे लखनौला पराभव पत्करावा लागला.
Leave a Reply