
यूएस ओपन 2026 मधील प्रभावी कामगिरीनंतर कझाकिस्तानची 26 वर्षीय टेनिसपटू एलेना रायबाकिनाने कारकिर्दीत पहिल्यांदाच जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवलं आहे. नंबर 1 बनणारी ती कझाकिस्तानची पहिली खेळाडू ठरली आहे.
या ऐतिहासिक कामगिरीसोबतच तिच्या लूकचीही सोशल मीडियावर चर्चा होत आहे. उंच शरीरयष्टी आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे चाहते तिची तुलना माजी रशियन टेनिस स्टार मारिया शारापोवाशी करत आहेत.
टेनिस कोर्टवरील आकर्षक खेळाडूंपैकी एक असलेल्या एलेना रायबाकिनाची तिच्या ग्लॅमरस लूकसोबतच शांत स्वभावासाठीही चर्चा होते. सुमारे 6 फूट उंच रायबाकिनाचं हसतमुख व्यक्तिमत्त्व आणि साधी देहबोली चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. तिची फॅशन, साधेपणा आणि खेळाडूवृत्तीचं सोशल मीडियावर कौतुक होत असून चाहते तिला प्रेमाने ‘कझाकिस्तानची राणी’ म्हणतात.
तिची टेनिस कारकीर्द यशस्वी ठरत आहे. 2022 मध्ये तिने विम्बल्डनचं विजेतेपद जिंकलं. त्यानंतर 2025 मध्ये वर्षातील प्रतिष्ठेच्या डब्ल्यूटीए फायनल्स स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. 2026 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून तिने आपल्या कारकिर्दीत आणखी एक मोठं यश जोडलं. त्यामुळे रायबाकिनाने सातत्यपूर्ण कामगिरी करत महिला टेनिसमध्ये आपलं स्थान आणखी मजबूत केलं आहे.
एलेना तिच्या सौंदर्यासोबतच आक्रमक खेळासाठीही ओळखली जाते. उत्तम फिटनेसच्या जोरावर ती प्रतिस्पर्ध्यांवर दबाव निर्माण करते. तिच्या आक्रमक शैलीमुळे तिने टेनिस विश्वातील अनेक नामांकित खेळाडूंना पराभूत केलं आहे.
17 जून 1999 रोजी मॉस्कोमध्ये जन्मलेल्या एलेना रायबाकिनाने कारकिर्दीच्या सुरुवातीला रशियाचं प्रतिनिधित्व केलं. मात्र, 2018 मध्ये कझाकस्तान टेनिस फेडरेशनकडून मिळालेल्या प्रशिक्षण आणि पाठिंब्यानंतर तिने कझाकस्तानचं नागरिकत्व स्वीकारलं. त्यानंतर कझाकस्तानकडून खेळताना तिने जागतिक टेनिसमध्ये मोठं स्थान निर्माण केलं. आता तिच्या कारकिर्दीतील सर्वात मोठ्या टप्प्यावर पोहोचत तिने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे.





Leave a Reply