
गणेश सोळंकी, टीव्ही 9 मराठी, बुलढाणा : बुलढाण्यामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील ऐतिहासिक चांडोळ गावात सम्राट अशोककालीन बुद्धमूर्तीचे अवशेष आढळल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या अवशेषांमुळे प्राचीन काळात चांडोळ परिसरात बौद्ध भिक्खूंचे वास्तव्य आणि बौद्ध धम्माचा प्रसार असल्याचे संकेत मिळत आहेत.
चांडोळ हे प्राचीन अजिंठा-भोगवर्धन व्यापारी मार्गावरील महत्त्वाचे ठिकाण मानले जाते. पैठण, भोकरदन, चांडोळ आणि अजिंठा घाटाला जोडणाऱ्या या मार्गावर व्यापारी तांडे तसेच भिक्खू संघांची ये-जा होत असल्याचे सांगितले जाते.
परिसरात जुन्या विटा, दगडी अवशेष आणि मातीची भांडी आढळत असल्याने चांडोळच्या पुरातात्त्विक महत्त्वात आणखी भर पडली आहे. बुद्धमूर्तीच्या अवशेषांची अधिकृत पुरातत्त्वीय तपासणी झाल्यास चांडोळच्या प्राचीन इतिहासाबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, बुद्धमूर्तीच्या अवशेषांच्या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे आता याप्रकरणी पुढे काय माहिती समोर येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




Leave a Reply