
Asha Bhosale : लोकप्रिय गायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. शेवटच्या श्वासापर्यंत संगीताची सेवा करणाऱ्या आशा ताईंनी तब्बल 12 हजार पेक्षा अधिक गाणी गायली आहेत. त्यांच्या नावावर अनेक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड देखील आहेत. वयाच्या 10 व्या वर्षी त्यांनी संगीत विश्वात पदार्पण केलं आणि वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. त्यांनी मराठी सिनेमांमध्ये सुरुवातीला गाणी गाण्यास सुरुवात केली, त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.. कोणाला ठाऊक होतं की एका लहान मुलीची ही साधी सुरुवात भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात अविस्मरणीय क्षणांपैकी एक बनेल? त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं की प्रतिभा आणि कठोर परिश्रमाने काहीही साध्य करता येतं.
फार कोणाला माहिती नसेल, जगात सर्वाधिक गाणी रेकॉर्ड केल्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आशाताईंच्या नावावर आहे. त्यांनी 20 हून अधिक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. हिंदी, मराठी किंवा इतर कोणतीही भाषा असो, त्यांचा आवाज सर्वत्र जादू निर्माण करणारा ठरला. हा आकडा केवळ एक संख्या नसून, त्यांच्या सात दशकांच्या कठोर सरावाचा आणि संगीताप्रती असलेल्या अढळ समर्पणाचा एक जिवंत पुरावा आहे.
आशा भोसले यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची ‘व्हर्सटॅलिटी’ . त्या प्रत्येक प्रकारचं गाणं अत्यंत कुशलतेने गाऊ शकत होत्या. त्यांनी शास्त्रीय संगीतापासून कव्वालीपर्यंत, कॅबरेपासून पॉपपर्यंत प्रत्येक जॅनरमध्ये गाणी गायली आहेत.
आशा भोसले यांनी ‘द क्रोनोस क्वार्टेट’ आणि ‘बॉय जॉर्ज’ यांसारख्या कलाकारांसोबत देखील काम केलं आहे. 2011 मध्ये आशा ताई यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं… भारत सरकारने आशा यांना पद्मविभूषण आणि दादासाहेब फाळके पुरस्कारासह देशाचे सर्वोच्च नागरी आणि चित्रपटविषयक सन्मान देऊन त्यांच्या कलागुणांचा गौरव केला. आज त्यांच्या निधनानंतर चाहत्यांसह, सिने आणि संगीत विश्वाला देखील मोठा धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनकच होती. डॉक्टरांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली, सर्व अवयव निकामी झाल्याने (मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे) त्यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं. त्यांना मेडिकल प्रॉब्लेम होता, असंदेखील डॉक्टर म्हणाले. त्यांच्या निधनानंतर अनेकांना प्रतिक्रिया देत दुःख व्यक्त केलं आहे.
Leave a Reply