
Ameesha Patel: अभिनेत्री अमीषा पटेलच्या आईवडिलांच्या घरातून दागिने चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतील चर्चगेट परिसरातील अमीषा पटेल आणि तिचा भाऊ अश्मित पटेल यांच्या आई-वडिलांच्या घरातून सोन्या-हिऱ्यांचे दागिने चोरीला गेल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी एका 40 वर्षीय घरकाम करणाऱ्या महिलेला अटक केली आहे. आरोपी महिलेचं नाव सीमा घाटे असून ती पालघरची रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पटेल कुटुंबाच्या घरातून सोन्याचे आणि हिऱ्यांनी जडवलेले दागिने चोरीला गेल्याची तक्रार करण्यात आली होती. चोरीला गेलेल्या दागिन्यांची किंमत सुमारे पाच लाख रुपये असल्याचं वृत्त आहे. या घटनेनंतर घरातील व्यक्तींनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आणि त्यानंतर मरीन ड्राईव्ह पोलिसांनी तपास सुरू केला.
तक्रारीच्या आधारे मरीन ड्राईव्ह पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 306 अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला हा गुन्हा एका अज्ञात महिलेविरोधात नोंदवण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम आणि पोलीस निरीक्षक व्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपी महिलेचा शोध घेत तिला विरार इथून ताब्यात घेतलं.
दीड वर्षांपासून घरात करत होती काम
तपासादरम्यान पोलिसांचा संशय घरात काम करणाऱ्या सीमा घाटेवर गेला. ती मागील दीड वर्षांपासून पटेल कुटुंबाच्या घरात घरकाम करत असल्याचं समोर आलं आहे. घरातील वस्तू आणि दागिन्यांची माहिती आरोपी महिलेला असल्याचा पोलिसांना संशय होता. तपास पुढे नेत असताना पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आणि चौकशीनंतर अटक केली. या प्रकरणात चोरी नेमकी कशा पद्धतीने करण्यात आली, चोरीचा माल कुठे ठेवण्यात आला आहे आणि या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास सध्या सुरू आहे. पोलिसांकडून चोरीला गेलेले दागिने परत मिळवण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.
आरोपीला पोलीस कोठडी
अटक करण्यात आलेल्या सीमा घाटेला न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर तिला 15 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या कालावधीत पोलिसांकडून तिची सखोल चौकशी केली जाणार आहे. चोरीमागील नेमका उद्देश काय होता आणि दागिने कुठे आहेत, याचा शोध घेण्यासाठी तपास महत्त्वाचा ठरणार आहे.
Leave a Reply