
आम आदमी पार्टीत सध्या बंडखोरीचे वारे वाहात आहेत. राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांना गटनेतेपदावरून काढल्यानंतर खऱ्या अर्थाने ठिणगी पडली. त्यानंतर संतापलेल्या राघव चढ्ढा यांनी सात राज्यसभा खासदारांसोबत भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. या खासदारांमध्ये माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग याचंही नाव आहे. राघव चढ्ढा, हरभजन सिंग आणि ‘आप’चे दोन-तृतीयांश खासदार काल भाजपमध्ये विलीन झाले आहेतत्यामुळे आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली आहे. क्रिकेटपटू हरभजन सिंग आम आदमी पार्टीच्या कोट्यातून राज्यसभेत गेले आहेत. पण त्याने बंडखोरी केल्याने संतापाची लाट उसळली आहे. त्याच्या घराबाहेर आप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि आपला रोष व्यक्त केल्या. इतकंच काय तर कार्यकर्त्यांनी त्याच्या घराच्या भिंतीवर गद्दार लिहित आपला राग व्यक्त केला.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओनुसार, काही कार्यकर्ते आम आदमी पार्टीचे खासदार हरभजन सिंग यांच्या निवासस्थानाजवळ पोहोचले. या दरम्यान काही कार्यकर्त्यांनी स्प्रे पेंटच्या माध्यमातून त्याच्या घराच्या भिंतीवर गद्दार असं लिहिलं. यावेळी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. पण तरीही कार्यकर्ते आपला रोष व्यक्त करण्यात यशस्वी झाले. ब्लॅक स्प्रेच्या माध्यमातून आप कार्यकर्त्यांनी त्याच्या घराच्या भिंतीवर इंग्रजी आणि पंजाबीमध्ये गद्दार लिहिलं आहे.
हरभजन सिंगसारखाच रोष अशोक मित्तल यांनाही सहन करावा लागला. अशोक मित्तलच्या लवली प्रोफेशनल युनिवर्सिटीच्या गेटबाहेर मोठ्या संख्येने आप कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी गेटवर ब्लॅक स्प्रे पेंटने ‘पंजाबचा गद्दार’ असं लिहिलं. राजकीय जाणकारांच्या मते, हा वाद येत्या काही दिवसात आणखी चिघळण्याची शक्यता आहे. या बंडखोरीमुळे पक्षात आणि पक्षाबाहेर चर्चा आणखी तीव्र झाली आहे. आता या प्रकरणावर राघव चढ्ढा आणि त्यांच्यासोबत बंडखोरी खासदार काय प्रतिक्रिया देतात याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागून आहे. हरभजन सिंगने या प्रकरणावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
Leave a Reply