
बॉलिवूडच्या इतिहासात काही चित्रपट असे आहेत, ज्यांनी केवळ बॉक्स ऑफिसवर यश मिळवलं नाही तर समाजातील संवेदनशील विषयांनाही पडद्यावर मांडलं. वैजयंतीमाला आणि सुनील दत्त यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘साधना’ हा त्यापैकीच एक चित्रपट. 1958 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट तब्बल 25 आठवडे सिनेमागृहात टिकला होता. मात्र, हा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेताना दिग्दर्शक-निर्माते बी. आर. चोप्रा यांना मोठ्या विरोधाचा सामना करावा लागला होता.
‘साधना’ची कथा वेश्यावृत्तीच्या विषयाभोवती फिरत होती. त्या काळात अशा विषयांवर आधारित अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले होते. त्यामुळे ‘पूर्णिमा’, ‘नर्तकी’ आणि ‘राज नर्तकी’ यांसारख्या चित्रपटांचं उदाहरण देत अनेक वितरकांनी बी. आर. चोप्रांना हा चित्रपट न बनवण्याचा सल्ला दिला. मात्र, त्यांनी कोणाचंही न ऐकता आपल्या कथानकावर विश्वास ठेवला आणि ‘साधना’ बनवण्याचा निर्णय घेतला.
कथेवर काम पूर्ण झाल्यानंतर बी. आर. चोप्रांनी गीतकार साहिर लुधियानवी यांना चित्रपटासाठी गाणी लिहिण्याची विनंती केली. साहिर यांनी आधी चित्रपटाची कथा ऐकली आणि त्यांना ती खूप आवडली. त्यानंतर चोप्रांनी त्यांना गाण्यासाठी एक खास प्रसंग सांगितला. त्यावेळी साहिर यांनी त्यांच्याकडे आधीच लिहिलेलं एक गाणं ऐकवलं. ते गाणं ऐकून बी. आर. चोप्रा भारावून गेले. हे गाणं जणू आपल्या चित्रपटासाठीच लिहिलं गेलं आहे, असंच त्यांना वाटलं.
गाणं पाहताना महिलांच्या डोळ्यात आले अश्रू
हेच गाणं पुढे ‘औरत ने जन्म दिया मर्दों को’ या नावाने अजरामर झालं. लता मंगेशकर यांच्या आवाजातील या गाण्यात महिलांच्या वेदना, त्यांचं दुःख आणि समाजातील त्यांची परिस्थिती प्रभावीपणे मांडण्यात आली होती. संगीतकार एन. दत्ता यांच्या संगीतामुळे आणि साहिर यांच्या आशयघन शब्दांमुळे या गाण्याला वेगळीच उंची मिळाली.
या गाण्याशी संबंधित एक हृदयस्पर्शी किस्सा बी. आर. चोप्रांनी एका मुलाखतीत सांगितला होता. ‘साधना’ प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांचा चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळत होता. एकदा बी. आर. चोप्रा स्वतः मराठा मंदिर सिनेमागृहात चित्रपट पाहण्यासाठी गेले. चित्रपटातील हे गाणं सुरू झालं आणि त्यांच्या आजूबाजूला बसलेल्या बुर्का घातलेल्या महिलांच्या डोळ्यातून अश्रू वाहताना त्यांनी पाहिलं.
चोप्रांना हे पाहून आश्चर्य वाटलं. त्यांनी हा योगायोग असेल असं समजलं. मात्र, काही काळानंतर ते पुन्हा त्याच सिनेमागृहात चित्रपट पाहण्यासाठी गेले. यावेळीही त्यांना तेच दृश्य पाहायला मिळालं. अनेक महिला बुर्का घालून सिनेमागृहात येत होत्या आणि हे गाणं पाहताना भावूक होत होत्या.
Leave a Reply