
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारीला अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली असून या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. येत्या २३ एप्रिलला या निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. या निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उमेदवार आहेत. सुनेत्रा पवारांविरुद्ध २२ ते २३ उमेदवार रिंगणात असून यात करुणा मुंडेंनीही अर्ज दाखल केला आहे. आता याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक सध्या अत्यंत चुरशीची बनली आहे. यातच करुणा मुंडे यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज चर्चेचा विषय ठरला आहे. यावर भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपच्या बड्या नेत्यांनी सांगितल्यास करुणा मुंडे यांनी नक्कीच उमेदवारी अर्ज मागे घेतला असता, असे रोहित पवार यांनी म्हटले.
जेव्हा महाविकासआघाडी सरकार विरोधात होते, तेव्हा धनंजय मुंडे हे विरोधी पक्षनेते असताना अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत होते. त्या काळात अधिवेशन सुरू असताना भाजपच्या एका प्रमुख नेत्याने करुणा मुंडे यांना आमंत्रित केले होते. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी भाजपवर बोलणे बंद केले होते. याच घटनेचा संदर्भ देत रोहित पवारांनी जर भाजपच्या एखाद्या मोठ्या नेत्याने करुणा मुंडे यांना सांगितले असते, तर त्यांनी निश्चितपणे आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असता, असा दावा केला आहे.
बारामतीतून एकही मतदान मिळणार नाही
करुणा मुंडेंचा उमेदवारी अर्ज कायम राहिला असला तरी बारामतीचे मतदार अतिशय सुजाण आहेत. बाहेरील ज्या लोकांनी येथे उमेदवारी दाखल केली आहे. त्यांना बारामतीतून एकही मतदान मिळणार नाही. त्यांचे स्वतःचे मतदान सोडले तर त्यांना त्यांच्या परिवाराचे मतदानदेखील मिळणार नाही, असे रोहित पवारांनी म्हटले. यावेळी रोहित पवारांनी सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. अजित दादांनी अनेकांना राजकारणात आणि सामाजिक कार्यात वैयक्तिक मदत केली आहे. त्यांच्या याच प्रेमापोटी आणि आदरापोटी आम्ही या निवडणुकीत प्रचार करत आहोत. ही निवडणूक भावनिक नात्याची आहे. त्या पलीकडे दुसरा कोणताही विषय नाही, असे रोहित पवारांनी म्हटले.
निवडणूक बिनविरोध करण्यात पवार साहेबांचा मोठा वाटा
बारामतीची निवडणूक सर्वात आधी ही बिनविरोध करण्याचा निर्णय शरद पवार यांच्या पक्षानेच घेतला होता. काही अटींवर काँग्रेसनेही माघार घेतली. प्रमुख पक्ष रिंगणात नसणे यात पवार साहेबांचा मोठा वाटा आहे. पवार साहेबांनी कुटुंबप्रमुख म्हणून आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली आहे, अशी भावना सामान्य लोकांमध्ये आहे, असेही रोहित पवारंनी सांगितले.
Leave a Reply