
नागपुरात ऐतिहासिक मारबत उत्सवाला सुरुवात झाली असून, नागपूरकर मोठ्या उत्साहात सहभागी झाले आहेत. गेल्या १४५ वर्षांपासूनची ही परंपरा नागपूरची सांस्कृतिक ओळख बनली आहे. यंदाही काळी आणि पिवळी मारबत मिरवणुकीसाठी निघाली असून, बुधवारी परिसरातून निघालेली पिवळी मारबत लवकरच नेहरू पुतळ्याजवळ काळ्या मारबतीला भेटणार आहे. हा गळाभेट सोहळा उत्सवातील एक महत्त्वाचा क्षण मानला जातो. समाजातील वाईट प्रवृत्ती आणि अनिष्ट विचार यांच्यावर प्रहार करणारे बडगे हे या उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले आहेत.
हे बडगे अनेक सामाजिक संदेश देतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह देश-विदेशातील अनेक पाहुणे हा अनोखा उत्सव पाहण्यासाठी नागपुरात दाखल झाले आहेत. लाखो नागपूरकर “इडापीडा घेऊन जा गे मारबत” असा जयघोष करत रस्त्यावर उतरले आहेत. १८८५ मध्ये पिवळ्या मारबतीची सुरुवात झाली होती. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच तान्हा पोळ्याच्या दिवशी, हा उत्सव नागपुरात मोठ्या उत्साहात साजरा होतो.
Leave a Reply