• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

तो रक्तबंबाळ होऊन तडफडला अन् लोक बघत राहिले.. मुंबई लोकल ट्रेनमध्ये काय घडलं? आरोपीचा छडा कसा लावला?

June 26, 2026 by admin Leave a Comment


फक्त दरवाजा बंद करण्यावरून 23 जून 2026 रोजी लोकल ट्रेनमध्ये झालेल्या हत्येनं मुंबईकरांना अक्षरश: हादरवून सोडलं. उकाड्याने त्रस्त झालेले मुंबईकर पावसाची आतुरतेने प्रतीक्षा करत होते. त्यामुळे 22 जूननंतर बरसलेल्या पावसाच्या सरींनी नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला होता. मात्र याच पावसामुळे लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून दोघांमध्ये क्षुल्लक वाद झाला आणि त्यात 22 वर्षीय तरुणाने आपला जीव गमावला. अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेनं मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेवरून पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याचसोबत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या 22 वर्षीय मयांक लोहारच्या व्हायरल व्हिडीओमुळे सोशल मीडियावरील कंटेंटला काही बंधनं आहेत की नाहीत, असाही सवाल केला जात आहे.

धावत्या लोकल ट्रेनमध्ये मयांक लोहार नावाच्या 22 वर्षीय प्रवाशाची चाकूने भोसकून हत्या केल्यानंतर आरोपी रोशन सुवर्णा (वय- 30 वर्षे) जवळपास 15 तास फरार होता. तो बोरिवलीहून मीरा रोड आणि त्यानंतर पनवेलला गेला. बुधवारी 24 जून 2026 रोजी दुपारी त्याला पनवेलमधून अटक करण्यात आली. रोशन हा मीरा रोडचा रहिवासी असून अंधेरी विमानतळाजवळील एका मालवाहतूक हाताळणी केंद्रात काम करत होता. तपास अधिकाऱ्यांच्या मते, त्याच कंपनीत त्याचे वडील आणि मोठा भाऊसुद्धा काम करतात.

घरी जाण्यापूर्वी रिचवली अख्खी दारूची बाटली

पोलिसांच्या चौकशीदरम्यान रोशनने सांगितलं, मंगळवारी संध्याकाळी त्याची शिफ्ट संपली होती आणि घरी परतण्यापूर्वी त्याने जवळपास रमची संपूर्ण बाटली रिचवली होती. रोशनला पनवेल रेल्वे स्टेशनवर अटक करणाऱ्या पथकातील एका पोलीस अधिकाऱ्याने याविषयी पुढे सांगितलं, “तो अंधेरी पूर्व इथं होता आणि सुरुवातीला त्याने कॅबने घरी जाण्याचा विचार केला. मात्र मुसळधार पावसामुळे कॅब बुकिंग होत नव्हती. यामुळे त्याने लोकल ट्रेनने घरी जाण्याचं ठरवलं. अंधेरी रेल्वे स्टेशनवरून त्याने लोकल पकडली.”

आरोपी रोशन सुवर्णाची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. तपास अधिकाऱ्यांना असंही समजलं की, हल्ल्यात वापरलेला चाकू घटनेच्या काही दिवसांपूर्वीच एका मित्राकडून विकत घेतला होता आणि तेव्हापासून तो त्याच्या बॅगेतच होता. “आम्ही मित्राची चौकशी करून आरोपीला चाकू बाळगण्याची गरज का वाटली, याचा छडा लावू”, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.

नेमकं काय घडलं?

23 जून 2026 च्या रात्री लोकल ट्रेन चर्चगेट स्टेशनवरून नालासोपाऱ्यासाठी रवाना झाली. ज्यावेळी ही ट्रेन अंधेरी स्टेशनवर पोहोचली, तेव्हा 22 वर्षांचा मयांक लोहार आणि 30 वर्षांचा आरोपी रोशन सुवर्णा हे दोन्ही प्रवासी एकाच फर्स्ट क्लास डब्यात चढले. अंधेरी ती बोरिवलीदरम्यान मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे डब्याचा दरवाजा बंद करण्यावरून या दोघांमध्ये वाद सुरू झाला. पावसाचं पाणी अंगावर येत असल्याने मयांकने दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला असता रोशनने त्याला विरोध केला. नंतर हा वाद इतका वाढला की रोशनने थेट त्याच्या बॅगमधून चाकू काढला आणि धावत्या ट्रेनमध्येच मयांकवर सपासप वार केले. रक्तबंबाळ झालेला मयांक जागीत कोसळला. या हल्ल्यानंतर रोशन बोरिवली स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 6 जवळ येत असतानाच ट्रेनमधून उडी मारून गर्दीत गायब झाला.

400 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासले

आरोपी फरार झाल्याने आणि त्याची तात्काळ ओळख पटू न शकल्याने बोरिवली शासकीय रेल्वे पोलिसांनी अनेक पथकांच्या मदतीने एक शोधमोहीम सुरू केली. अधिकाऱ्यांनी पश्चिम रेल्वे कॉरिडॉरमधील स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. पोलिसांनी चर्चगेट आणि नालासोपारा दरम्यानच्या रेल्वे स्थानकांवर आणि लगतच्या परिसरातील जवळपास 400 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासले. जेव्हा अधिकाऱ्यांना आरोपीचे स्पष्ट फोटो मिळाले, तेव्हा या प्रकरणात मोठं यश मिळालं. एका फोटोमध्ये रोशनच्या टी-शर्टवर तो काम करत असलेल्या कंपनीचा लोगो छापलेला दिसला, ज्यामुळे पोलिसांना पहिला ठोस धागा मिळावा. त्यानंतर अधिकाऱ्यांनी कार्गो कंपनीला भेट देऊन रोशनच्या ओळखीची खात्री पटवली. तिथूनच पोलिसांनी त्याचा राहण्याचा पत्ता, मोबाइल नंबर यासह इतर तपशील गोळा केले.

तपासादरम्यान असं आढळून आलं की रोशन आधी मीरा रोड इथल्या त्याच्या घरी गेला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, तो एका ऑटोरिक्षाने घरी गेला, अंघोळ केली आणि शहर सोडून जाण्याची तयारी करत काही कपड्यांची बांधाबांध केली. लवकरच परत येईन असं कुटुंबीयांना कळवून पनवलेला जाण्यासाठी त्याने ओला कॅब बुक केली. रोशनने त्याच्या मूळ गावी मंगळुरूला जाण्यासाठी बसचं तिकिट खरेदी केलं होतं, जी दुपारी 3 वाजताच्या सुमारास सुटणार होती. तोपर्यंत तपासकर्त्यांना त्याच्या ठिकाणाची माहिती मिळाली होती. जेव्हा पोलिसांचं एक पथक पनवेलला पोहोचलं, तेव्हा दुपारी 2 वाजताच्या सुमारास तो रेल्वे स्टेशनवर बसलेला आढळला. पोलिसांनी स्टेशनवरूनच त्याला ताब्यात घेऊन बोरिवली जीआरपीमध्ये आणलं.

ताब्यात घेतल्यानंतर विचारला मयांकबद्दल प्रश्न

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर रोशनने मयांकबद्दल त्यांना प्रश्न विचारला. मयांक जिवंत आहे का, असं विचारला असता पोलिसांनी त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची खोटी माहिती दिली. नंतर जेव्हा रोशनने त्याच्या मोबाइलवरून इंटरनेटवर सर्च केलं, तेव्हा त्याला मयांकच्या मृत्यूबद्दलची माहिती मिळाली होती. आवेशात येऊन रोशनने काही चुकीचं पाऊल उचलू नये म्हणून पोलिसांनी त्याला मयांकबद्दल खोटं सांगितलं होतं. पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर त्याला हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात येत असल्याची औपचारिक माहिती देण्यात आली.

या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मेट्रो स्टेशनप्रमाणे लोकल ट्रेनच्या स्टेशनवर बॅग स्कॅनिंग मशीन किंवा मेटल डिटेक्टर्स का नाहीत, एखादी व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी बॅगेत चाकू घेऊन निश्चिंतपणे कशी फिरू शकते, असे अनेक प्रश्न मुंबईकरांकडून उपस्थित केले जात आहेत. तर दुसरीकडे किरकोळ वादातून अशा प्रकारे एखाद्याची क्रूरपणे हत्या करण्यापर्यंतची मजल तरुणाची कशी गेली, यावरही प्रश्नचिन्ह आहे. कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेला, नोकरदार आणि सुशिक्षित तरुणाने केलेल्या या कृत्यामुळे मानसिक आरोग्य आणि हिंसक प्रवृत्तींबद्दल पुन्हा चर्चा होत आहे.

विचलित करणारी दृश्ये सर्रास व्हायरल

मयांक लोहारच्या हत्याप्रकरणातील आणखी एक गंभीर बाब म्हणजे सोशल मीडियावर सर्रास व्हायरल होणारे व्हिडीओ. ही घटना घडत असताना डब्यात उपस्थित असलेल्यांपैकी काहींनी त्यांच्या मोबाइलवर व्हिडीओ शूट केला आणि नंतर ते सोशल मीडियावर व्हायरल झाले. या व्हिडीओमुळे आरोपीचा थेट चेहरा आणि इतर महत्त्वाचे पुरावे पोलिसांना मिळाली, इथवर सर्व ठीक होतं, पण रक्तबंबाळ झालेल्या मयांकचे फोटो आणि व्हिडीओ इतक्या वेगाने सोशल मीडियावर व्हायरल झाले, की लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत.. सर्वांच्या स्क्रीनवर ते पोहोचलं. इतकं संवेदनशील आणि विचलित करणारी दृश्ये अशा पद्धतीने कोणत्याही सेन्सॉरशिवाय जेव्हा सोशल मीडियावर पोहोचतात, तेव्हा त्यावरून बरेच प्रश्न उपस्थित होतात. रोशन सुवर्णाला त्याच्या गुन्ह्याबाबत शिक्षा होईलच, मात्र सर्व नियम धाब्यावर बसून सोशल मीडियावर सर्व घटनांचे व्हिडीओ सर्रास शेअर करण्याबाबत भविष्यात सरकार काही निर्णय घेणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सांगता काय? टोमॅटोच्या झाडांना हलवल्यावर भरघोस उत्पादन? काय आहे तज्ज्ञांचे मत?
  • शाहरुख खान अन् प्रीती झिंटानंतर आता ‘या’ अभिनेत्याची पण क्रिकेटमध्ये एन्ट्री, कोणत्या संघाचा मालक बनला?
  • आता बाईकसारखे पुढे झुकून चालवणार कार! डच कंपनीने सादर केली अनोखी ‘ॲपेक्स पोझिशन’ ड्रायव्हिंग स्टाईल
  • Kangana Ranaut : केतन अग्रवाल प्रकरणात कंगना राणौतची सियाच्या आई-वडिलांबाबत वेगळी विचार करायला भाग पाडणारी भूमिका
  • Indian Railways : ट्रेनमधून सामान नेण्याबाबतचे नियम बदलले, आता या वस्तूंना मिळाली मंजूरी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in