
प्रहार जनशक्तीचे नेते बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांना विधान परिषदेवर घेण्यात आले आहे.यामुळे आता बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती संघटनेचे काय होणार ? तसेच बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे म्हटले जात आहे.या पार्श्वभूमीवर आमदार बच्चू कडू यांनी आपली भूमिका मांडली आहे.
बच्चू कडू यांनी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना अनेक मुद्यांवर आपली बाजू मांडली आहे. ते म्हणाले की प्रश्न जबाबदारीचा नाही तर मुद्द्याचा आहे मी मुद्दे घेऊन लढणार आहे. शिवसेनेचा एक नवीन चेहरा पाहायला मिळणार आहे, जो शेतकऱ्यांसाठी दिव्यांगांसाठी आणि मजुरांसाठी लढणारा असेल असेही त्यांनी ठासून सांगितले.
मी हाती भगवा घेतला आहे, तो छत्रपती शिवरायांच्या विचाराचा आहे, त्या विचाराने शिवसेनेच्या विचाराने शिवसेनेची ताकद वाढवू, आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत शेतकरी मजूर दिव्यांगांचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत लढू, काही सुटले तरी चालेल पण शेतकऱ्यांपासून आणि दिव्यांगांपासून अलिप्त होणार नाही असेही बच्चू कडू यांनी सांगितले.
आता प्रहारमध्ये ज्यांना काम करायचं आहे ते करणार, ज्यांना राष्ट्रीय काम करायचा ते शिवसेनेत येणार, काही नालायक असतात ते विरोध करतात, त्यांना राहायचं आहे, त्यांनी राहावं मी कोणाला जबरदस्ती करणार नाही अशा शब्दात बच्चू कडू यांनी टीकाकारांना सुनावले आहे.
मी शिवसेनेपासून प्रवास सुरू केला होता
इथून पुढे आमचा राजकीय प्रवास शिवसेनेचा असेल सुरुवातीला मी शिवसेनेपासून प्रवास सुरू केला होता. आता शिवसेनेत आलो. काही बगलबच्चे असतात जे इकडे तिकडे जातात, पण शिवसेना सोडल्यानंतर बच्चू कडू ‘प्रहार’ म्हणून एकटा लढला कुठल्या पार्टीत गेलो नाही. पाच सहा निवडणुका लढलो एकाही पार्टीचा पाठिंबा घेतला नाही असेही बच्चू कडू यांनी सांगितले.
साडेतीनशे गुन्हे दाखल असणारा…
साडेतीनशे गुन्हे दाखल असणारा बच्चू कडू दुसरा महाराष्ट्रात सापडणार नाही. राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रवादी विलीन होते त्यावर कोणी टीका करत नाही. नगरपालिकेत राज साहेब आणि उद्धव साहेब एकत्र होतात त्यांच्यावर कोणी टीका करत नाही. उद्धव ठाकरे काँग्रेससोबत बसली, त्यांच्यासोबत वर कोणी टीका करत नाही, त्यांच्यावर फडणवीस सुद्धा टीका करीत नाही, पण बच्चू कडूवर टीका करायला सुरुवात झाली असे बच्चू कडू त्राग्याने म्हणाले.
मला आत्मविश्वास आहे आणि प्रहारच्या कार्यकर्त्यांचा बच्चू कडूवर विश्वास आहे, मी थांबणारा बच्चू कडू नाही असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांचा आवाज बुलंद होईल. ट्रोल करणारे 50 पैशांना विकत भेटतात, त्याची आम्ही पर्वा करीत नाही. सगळ्या लोकांच्या कॅबिन त्याच्यासाठी भरल्या आहेत,ट्रोल करणारे अर्धे विकाऊ आहेत. तुम्हाला सांगून देतो की तुमच्या न्यूजवर माझ्या बाजूने किती ट्रोल पाहिजे ते सांगा त्यासाठी एक-दोन लाखाचा खर्च करावा लागतो असेही ते यावेळी म्हणाले.
राजकीय परिस्थिती म्हणून आम्ही निर्णय घेतला
बच्चू कडूवर विश्वास ठेवा. बच्चू कडूचा आत्मविश्वास मोठा आहे, पाखंडी लोकांसोबत चर्चा करू नका, शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली. कर्जमाफीची घोषणा करून घेणारा बच्चू कडूशिवाय दुसरा कोणी होता का ? या हाताचे बंधन जीआर काढल्याशिवाय सुटणार नाही. जीआर पंधरा दिवसात निघणार आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन केल्यानंतर प्रहार सोडून कोणी आमचे आभार मानले आहे का ? राजकीय परिस्थिती म्हणून आम्ही निर्णय घेतला आहे, याही परिस्थितीत आम्ही टिकू तर शेतकरी आणि दिव्यांगांचा मुद्दा टिकेल. आमची इमानदारी आहे, ट्रोल करणारे भामटे लोक आहेत त्यांच्यापासून आम्ही पळत नाही यांचे मायबाप दहा असतात अशी टीका बच्चू यांनी केली आहे.
Leave a Reply