
गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि महाराष्ट्रात सर्वत्र बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. कोकणातल्या गणेशोत्सवाला एक वेगळंच महत्त्व आहे. घराघरात बाप्पाचं स्वागत, पारंपरिक पूजा, आरती, भजन आणि गावच्या वातावरणात होणारा उत्सव हा कोकणच्या गणेशोत्सवाचा खास भाग आहे.
याच पारंपरिक आणि उत्साही वातावरणाची झलक आता ‘सनई चौघडे’ मालिकेतही पाहायला मिळणार आहे. यावर्षी ‘परब’ कुटुंब गणपतीच्या उत्सवासाठी गावी जाणार आहे. त्यांच्यासोबत खानोलकर कुटुंबातील काही सदस्यही गावात पोहोचणार आहेत.
हरतालिकेचं पूजन, कार्यशाळेतून गणपतीचं आगमन, चार मुलींच्या हातून बाप्पाचं आगमन, गावातली आरती, डबल बारी भजन, गौरीचं आगमन आणि पारंपरिक पद्धतीने होणारं गणपती विसर्जन अशा अनेक प्रसंगांमधून कोकणातला गणेशोत्सव प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. यावेळी गावातील मंडळी डोक्यावरून गणपती घेऊन मिरवणुकीत सहभागी होताना दिसतील.
या गणेशोत्सवाच्या शूटिंगचा अनुभव सांगताना शर्वरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री चिन्मयी साळवी म्हणाली, “माझ्यासाठी हा अनुभव खूपच खास आहे. मी पहिल्यांदाच कणकवलीला गेले होते आणि मला माझ्याच गावी आल्यासारखं वाटलं. माझं गाव संगमेश्वर असल्यामुळे इथला दरवळ, शेणी-चुलीचा वास आणि गावचं वातावरण खूप आपलंसं वाटलं. गणपतीसाठी सुट्टीचा अर्ज घेऊन चाकरमणी जसे गावी जातात, अगदी तसेच आम्ही सगळे गावी आलोय. यामध्ये खानोलकर कुटुंबातलेसुद्धा काही मेंबर्स आहेत, त्यामुळे पुढे खूप इंटरेस्टिंग गोष्टी पाहायला मिळणार आहेत.”
आमचा शेवटचा दिवस बीचवर शूटिंगचा होता आणि त्या दिवशी आम्ही सगळ्यात जास्त धमाल केली. तिथलं जेवण इतकं भारी होतं आणि भजन, आरती, डबल बारी ठेवली होती, त्यात तर पूर्ण युनिटने खूप एन्जॉय केलं. आम्ही अक्षरशः पहाटे पाच वाजेपर्यंत नाचलो आणि दुसऱ्या दिवशी साडेआठचा कॉल टाइम असूनही सगळे फुल एनर्जीमध्ये होते. अशीच धम्माल-मस्ती करत, फुल एनर्जीने आम्ही हे संपूर्ण शूट केलंय आणि ही एनर्जी नक्कीच प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल, याची मला खात्री आहे,” असं चिन्मयीने सांगितलं.





Leave a Reply