
1980 च्या दशकाच्या अखेरीस रेडिओ आणि कॅसेट प्लेअर हे प्रत्येक घरातील मनोरंजनाचे महत्त्वाचे साधन होते. याच काळात अनेक गाणी प्रेक्षकांच्या प्रचंड आवडीची झाली होती. लोकं दिवसरात्र रेडीओवर तिच गाणी एकत असत. याच काळात पाकिस्तानमधून आलेल्या एका गाण्याने भारतासह संपूर्ण दक्षिण आशियात लोकप्रियतेचे नवे विक्रम केले. ‘हवा हवा ऐ हवा’ या गाण्याची धून इतकी आकर्षक होती की भाषा समजत नसतानाही लोक त्यावर ठेका धरायचे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ चित्रपटामुळे हे गाणे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
पाकिस्तानी पॉप गायक हसन जहांगीर यांनी हे गाणे 1986 मध्ये रेकॉर्ड केले आणि 1987 मध्ये ते रिलीज झाले. ‘हवा हवा’ या अल्बमलाही भारतात मोठा प्रतिसाद मिळाला. रेडिओवर या गाण्याची वारंवार फर्माईश व्हायची, तर त्याच्या लाखो कॅसेट्स विकल्या गेल्या. हसन जहांगीर स्वतः म्हणतात की ‘हवा हवा ऐ हवा’च्या बीट्सच अशा आहेत ज्या प्रत्येक संस्कृतीत सहज बसतात. त्यामुळे हे गाणे एका पिढीच्या आठवणींचा भाग बनले. त्यावेळी सोशल मीडिया किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्म नव्हते, त्यामुळे रेडिओ आणि कॅसेटच्या माध्यमातूनच गाणी घराघरात पोहोचायची. एखादे गाणे लोकप्रिय झाले की त्याची फर्माईश रेडिओ केंद्रांवर मोठ्या प्रमाणात केली जायची आणि कॅसेटच्या दुकानांबाहेरही गर्दी दिसायची.
या गाण्याची मुळे मात्र ईरानमध्ये आहेत. 1970 च्या दशकात ईरानी सायकेडेलिक रॉकचे प्रसिद्ध संगीतकार कूरोश यागमई यांनी फारसी भाषेतील ‘हवा हवा’ हे गाणे सादर केले होते. प्रेम आणि प्रतीक्षेची भावना सांगणारी ही धून 1979 च्या इस्लामिक क्रांतीनंतर पाकिस्तानमध्ये पोहोचली. त्यानंतर हसन जहांगीर यांनी या धुनेला उर्दू रूप देत नवा अंदाज दिला.
पुढे या धुनेने बॉलिवूडमध्येही अनेकदा पुनर्जन्म घेतला. ‘बिल्लू बादशाह’मध्ये ‘जवान जवान इश्क जवान’, ‘आग का गोला’मध्ये ‘आया आया प्यार आया’ अशी गाणी आली. ‘चालिस चौरासी’मध्ये हसन जहांगीर यांनी पुन्हा हे गाणे सादर केले, तर ‘मुबारकां’मध्ये मीका सिंह यांच्या आवाजात त्याचा रीमेक करण्यात आला. आता ‘धुरंधर’मधील वापरामुळे जुनी आठवण पुन्हा ताजी झाली आहे. अनेक दशकांनंतरही या गाण्याची धून प्रेक्षकांना आकर्षित करते, हेच त्याच्या लोकप्रियतेचे वैशिष्ट्य मानले जाते.
Leave a Reply