
जर तुम्हीही शाळा-कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी किंवा सरकारी कामात जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) आता अधिकृतपणे स्पष्ट केले आहे की, आधार कार्ड हे केवळ तुमची ओळख (Identity) आणि पत्ता (Address) सिद्ध करण्यासाठी वापरता येईल. आधार कार्ड हे तुमच्या अचूक जन्मतारखेचा (DOB) अधिकृत पुरावा मानला जाणार नाही.
UIDAI ने हा निर्णय का घेतला?
UIDAI ने आधार युजर्स एजन्सी (AUAs) आणि ई-केवायसी युजर्स एजन्सी (KUAs) यांना पाठवलेल्या पत्रात या निर्णयामागची तांत्रिक कारणे स्पष्ट केली आहेत.
आधार नोंदणी करताना अनेक नागरिक त्यांच्याकडे वैध कागदपत्रे नसल्यास केवळ तोंडी जन्मतारीख सांगतात. अशा वेळी ती घोषित (Declared) तारीख मानली जाते. ती प्रमाणित (Verified) मानली जात नाही. जर एखाद्या व्यक्तीला आपली अचूक जन्मतारीख माहित नसेल, तर आधार प्रणाली केवळ जन्माच्या वर्षाच्या आधारावर १ जानेवारी ही तारीख डिफॉल्ट म्हणून नोंदवते. यामुळे अनेक प्रकरणांमध्ये आधारमधील जन्मतारीख चुकीची असू शकते. आधारचा मूळ उद्देश बायोमेट्रिक (ठसे आणि डोळ्यांचे स्कॅनिंग) वापरून व्यक्तीची ओळख पटवणे हा आहे. कागदपत्रांची ऐतिहासिक पडताळणी करणे हा नाही. यामुळे आधारमधील जन्मतारीख नेहमीच अचूक असेल असे सांगता येत नाही.
आता जन्मतारखेसाठी कोणते पुरावे ग्राह्य धरले जातील?
आधार कार्ड या शर्यतीतून बाहेर पडल्यामुळे, आता नागरिकांना जन्मतारखेच्या पुराव्यासाठी खालील कागदपत्रांचा वापर करावा लागणार आहे.
१. जन्म दाखला (Birth Certificate)
२. शाळा सोडल्याचा दाखला (LC / TC)
३. १० वी किंवा १२ वीचे बोर्ड सर्टिफिकेट
४. पॅन कार्ड (काही विशिष्ट ठिकाणी)
५. पासपोर्ट
सरकारी योजनांवर काय परिणाम होणार?
UIDAI ने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, कल्याणकारी योजना, सबसिडी आणि इतर सरकारी सेवांसाठी आधारचा वापर सुरूच राहील. मात्र, एखाद्या योजनेत वयाची अट असेल (उदा. पेन्शन योजना किंवा विमा), तर तिथे वयाची खात्री करण्यासाठी आधारव्यतिरिक्त इतर कागदपत्रांची मागणी करण्याचे अधिकार संबंधित विभाग किंवा बँकांना असतील.
आधारचे कोणते प्रकार अद्याप वैध आहेत?
- फिजिकल आधार कार्ड
- ई-आधार (e-Aadhaar)
- मास्क्ड आधार (Masked Aadhaar)
- आधारवरील क्यूआर कोड (QR Code)
Leave a Reply