
जगावर आता आणखी एका युद्धाचे सावट आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये 29 डिसेंबर रोजी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. या बैठकीत बेंजामिन नेतान्याहू इराणच्या कथित बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाबाबत ट्रम्प यांना माहिती देणार आहेत. तसेच याचा धोका किती आहे? यावर कारवाई करणे गरजेचे आहे का? याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा होणार आहे. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी जर कारवाई करण्यास परवानगी दिली तर इस्रायल आगामी काळात इराणवर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
इराणवर पुन्हा हल्ला करणार ?
एनबीसी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार इराणने आपल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रकल्पावर चांगलाच भर दिला आहे. यामुळे इस्रायली अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे. इराणचा अणु प्रकल्प बंद पाडण्यासाठी ते ट्रम्प यांना याबाबत माहिती देत आहेत. जर ट्रम्प यांनी याला परवानगी दिली तर आगामी काळात इस्रायलतचे सैन्य इराणवर हल्ला करू शकतात. त्यामुळे आता महत्त्वाचा निर्णय ट्रम्प यांच्या हातात आहे.
जूनमध्ये इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध
जूनमध्ये इराण आणि इस्रायलमध्ये दोन आठवडे युद्ध चालले होते. या काळात इस्रायलच्या हल्ल्यांमुळे इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे नुकसान झाले होते. मात्र आता इराण युद्धादरम्यान अमेरिकेच्या बॉम्ब हल्ल्यात नष्ट झालेल्या अणुस्थळांची पुनर्बांधणी करत आहे. त्यामुळे इस्रायली अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे. इराणचा हा प्रकल्प केवळ त्यांच्या देशासाठीच नाही तर संपूर्ण प्रदेशासाठी आणि अमेरिकेसाठीही घातक ठरू शकतो. त्यामुळे इस्रायल इराणविरुद्धच्या लष्करी कारवाईत अमेरिका सहभागी होणार का याबाबत ट्रम्प यांना विचारत आहेत.
व्हाईट हाऊसने काय म्हटले ?
व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या अॅना केली यांनी म्हटले की, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी आणि इराणी सरकारने ऑपरेशन मिडनाईट हॅमरने इराणची अणु क्षमता पूर्णपणे नष्ट केल्याच्या अमेरिकन सरकारच्या दाव्याची पुष्टी केली आहे. आता ट्रम्प यांनी म्हटले आहे की जर इराणने अणुशस्त्रे विकसित करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्या प्लांटवर हल्ला करू आणि सर्वकाही नष्ट करू.
Leave a Reply