
40 दिवसांच्या अविरत संघर्षानंतर अखेर बुधवारी अमेरिका-इराणने एक पाऊल पुढे टाकत युद्धविरामाची घोषणा केली. त्यानंतर शांतता चर्चेसाठी दोन्ही देशांच प्रतिनिधी आज पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये भेटणार असून या भेटीकडे जगाचे लक्ष लागलं असून या युद्धावर अखेर काय तोडगा काढला जातो, हेही जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता आहे. मात्र पाकिस्तानमध्ये शांतता चर्चा सुरू होण्याआधीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आंनी इराणला पुन्हा धमकी दिली आहे,
इराण केवळ चर्चेसाठीच जिवंत आहे, असं ट्रम्प म्हणाले. “इराणकडे दुसरा पर्याय नाही; ते केवळ चर्चेसाठीच जिवंत आहे.” असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले. इस्लामाबादमधील चर्चेच्या काही तास आधीच ट्रम्प यांनी ही धमकी दिली.
ट्रम्प यांनी ट्रुथसोशलवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात त्यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीचाही उल्लेख केला आहे. इराण आंतरराष्ट्रीय जलमार्गांवर नियंत्रण मिळवून जगाकडून पैसे उकळत आहे, असं ते म्हणाले. ” आंतरराष्ट्रीय जलमार्गांचा वापर करून जगाला धमकावण्यासाठी इराणकडे कोणतेही अस्त्र नाही; वाटाघाटी करण्यासाठीच ते आज जिवंत आहेत.” असंही ट्रम्प यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय.
इराणला ट्रम्प यांची धमकी
‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्टमध्ये ट्रम्प यांनी लिहीलं की, इराणला हे समजून घेण्याची गरज आहे की, त्यांनी आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. ट्रम्प यांनी पुढे असाही दावा केला की, इराणने सहकार्य केले नाही तरीही अमेरिका लवकरच होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्यासाठी पावले उचलेल. अमेरिका या मुद्द्यावरून माघार घेण्याच्या मनःस्थितीत नसल्याचं त्यांच्या या विधानावरून स्पष्ट होतंय.
ते (इराण) वाटाघाटींदरम्यान एक गोष्ट सांगतात आणि प्रसारमाध्यमांसमोर दुसरीच गोष्ट सांगतात, असा आरोपही ट्रम्प यांनी इराणवर केला. इराणने अण्वस्त्रे सोडून देण्याची आपली तयारी उघडपणे जाहीर केली, पण नंतर युरेनियम संवर्धनाबद्दल ते बोलले. इराणी लोक लढण्यापेक्षा प्रचार आणि प्रतिमा उभारणीत अधिक पारंगत आहेत असंही ट्रम्प म्हणाले.
अमेरिकेचे उपराष्ट्रपती इस्लामाबादेत दाखल
अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स आणि त्यांचे पथक इस्लामाबादमध्ये दाखल झाले असून, तेथे ते इराणी प्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत. या चर्चेत पाकिस्तान मध्यस्थाची भूमिका बजावत असून दोन्ही देशांमध्ये करार घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे. जर ही चर्चा यशस्वी झाली नाही, तर परिस्थिती पुन्हा चिघळू शकते, असे संकेत ट्रम्प यांनी दिले होत. अमेरिकेची युद्धनौका आधीच सज्ज असून, गरज पडल्यास कारवाई केली जाऊ शकते असा इशारा त्यांनी दिला होता.
त्यामुळे इराण-अमेरिकेदरम्यान हाँ युद्धविरा किती काळ टिकतो, इस्लामाबादमध्ये चर्चेत काय तोडगा निघतो याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.
Leave a Reply