
टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेची सांगता झाल्यानंतर आयसीसीने क्रिकेट क्रमवारी जाहीर केली आहे. टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या 10 व्या पर्वात जबरदस्त कामगिरी केली. या कामगिरीचा भारतीय खेळाडूंना टी 20i रँकिंगमध्ये चांगला फायदा झाला आहे. काही खेळाडूंना आपलं स्थान कायम राखलंय. तर काही खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर आयसीसी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. काही खेळाडूंना सातत्यपूर्ण खेळी न केल्याचा फटका बसला आहे. या रँकिंगमध्ये कोणता खेळाडू कोणत्या स्थानी आहे हे जाणून घेऊयात.
इशानची मोठी झेप, अभिषेकला धोका
इशान किशन याने या स्पर्धेतील बहुतांश सामन्यात वादळी खेळी करुन वेगवान सुरुवात करुन देण्यात योगदान दिलं. इशानने यासह फलंदाजांच्या क्रमावारीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. त्यामुळे ओपनर अभिषेक शर्मा याचं अव्वल स्थान धोक्यात आलं आहे. विकेटकीपर बॅट्समन संजू सॅमसन याला अर्धशतकी हॅट्रिकचा मोठा फयदा झालाय. संजूनेही रँकिंगमध्ये मोठी झेप घेतलीय. तर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा या दोघांची रँकिंगमध्ये घसरण झाली आहे.
अभिषेकचं पहिलं स्थान धोक्यात
अभिषेकला या स्पर्धेत धावांसाठी संघर्ष करावा लागला. अभिषेक पहिल्या तिन्ही सामन्यांमध्ये सलग झिरोवर आऊट झाला. मात्र अभिषेकने फायनलमध्ये वेगवान अर्धशतक झळकावत लाज राखली. अभिषेकला त्या खेळीमुळे अव्वल स्थान राखण्यात यश आलं आहे.मात्र त्याच्या पहिल्या स्थानावर टांगती तलवार आहे. अभिषेक आणि इशान या दोघांमध्ये फार फरक नाही. नंबर 1 अभिषेकच्या खात्यात 875 तर दुसऱ्या स्थानी असलेल्या इशानच्या नावावर 871 रेटिंग पॉइंट्सची नोंद आहे.
तिलक-सूर्याला झटका
तिलक वर्मा याला एका स्थानाचा फटका बसला आहे. तिलक सहाव्या स्थानावरुन सातव्या स्थानी घसरला आहे. तर कर्णधार सूर्यकुमार यादव यालाही वर्ल्ड कप जिंकून दिल्यानंतरही बॅटिंग रँकिंगमध्ये फटका बसला आहे.सूर्याची रँकिंगमध्ये सातव्या क्रमांकावरुन नवव्या स्थानी घसरण झाली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, सूर्याच्या खात्यात 722 रेटिंग पॉइंट्स आहेत.
संजूचा धमाका
संजूने वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या विरुद्ध अनुक्रमे 97, 89 आणि 89 अशा धावा केल्या. संजूला याचा मोठा फायदा झाला. संजू रँकिंगमध्ये 18 स्थानांची झेप घेत थेट 22 व्या क्रमांकावर पोहचला आहे.
राशिद खानने वरुण चक्रवर्तीचं सिंहासन हिसकावलं
टीम इंडियाचा फिरकीपटू वरुण चक्रवर्ती त्याचं अव्वल स्थान कायम राखण्यात अपयशी ठरला. अफगाणिस्तानच्या अनुभवी ऑलराउंडर राशिद खान वरुणला मागे टाकत नंबर 1 गोलंदाज ठरला आहे. राशिदच्या खात्यात 753 तर वरुणच्या नावावर 740 रेटिंग पॉइंट्सची नोंद आहे.
Leave a Reply