
प्रयागराज येथील महाकुंभ मेळाव्यात फुले विकून मोनालीसा भोसले रातोरात स्टार बनली. त्यानंतर तिला एका सिनेमामध्ये काम करण्याची संधी मिळाली. प्रसिद्ध झालेल्या मोनालिसा भोसलेने महिला भरापूर्वीच बॉयफ्रेंड फरमान खानशी लग्न केले. आता या लग्नात मोठा ट्विस्ट आला आहे. पोलिसांनी फरमानला अटक केल्याचे बोलले जात आहे. आता नेमकं काय झालं आहे? चला जाणून घेऊया…
मोनालिसा भोसले ही प्रयागराजच्या कुंभमेळ्यात व्हायरल झालेली तरुणी. तिने केरळच्या तिरुवनंतपुरम येथील पुवार मंदिरात फरमान खान यांच्याशी लग्न केले. या लग्नाला ‘लव्ह जिहाद’चा रंग देण्यात आला होता आणि देशभरात मोठी चर्चा झाली होती. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने नागपूरचे सामाजिक कार्यकर्ते व वकील प्रथम दुबे यांच्या तक्रारीवरून या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी केली. आयोगाच्या दोन सदस्यीय समितीने केरळ आणि मध्य प्रदेशातील माहेश्वर येथे भेट देऊन तपास केला.
समितीने माहेश्वरच्या सरकारी रुग्णालयातील प्रसूती नोंदणी कागदपत्रे तपासली. त्यातून असा निष्कर्ष निघाला की, मोनालिसाच्या आईला ३० डिसेंबर २००९ रोजी प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. याचा अर्थ लग्नाच्या वेळी मोनालिसा फक्त १६ वर्षे २ महिन्यांची होती. आयोगाच्या अहवालानुसार, लग्नासाठी वयाचा बनावट दाखला तयार करण्यात आला होता. आधार आणि इतर सरकारी कागदपत्रांमध्ये बनावट नोंदी करण्यात आल्याचेही तपासात समोर आले.
या प्रकरणी माहेश्वर पोलिसांनी फरमान खानवर POCSO कायदा, अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा आणि अपहरण (कलम १३७(२)) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मोनालिसाच्या कुटुंबीयांनी सुरुवातीपासून या नात्याला विरोध केला होता आणि ती अल्पवयीन असल्याचा दावा केला होता. मात्र, केरळ पोलिसांनी प्राथमिक तपासात तिला १८ वर्षांची असल्याचे सांगितल्याने लग्नाला परवानगी मिळाली होती.
लग्नापूर्वी मोनालिसाने तिरुवनंतपुरम पोलिसांकडे तक्रार केली होती की, तिचे वडील विजय सिंह भोसले तिला त्यांच्या पसंतीच्या पुरुषाशी लग्न करण्यासाठी दबाव टाकत आहेत. सध्या या प्रकरणात मोनालिसाचे लग्न बेकायदेशीर ठरू शकते आणि फरमान खान यांच्यावर गंभीर गुन्ह्याचे आरोप आहेत. पुढील कायदेशीर प्रक्रिया काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




Leave a Reply