
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचा थरार संपल्यानंतर क्रिकेट चाहत्यांना आयपीएलच्या आगामी 19 व्या मोसमाच्या वेळापत्रकाचे वेध लागले होते. बीसीसीआयकडून बुधवारी 11 मार्च रोजी या 19 व्या हंगामासाठी वेळापत्रक जाहीर केलं. मात्र 4 राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे बीसीसीायकडून फक्त पहिल्या 16 दिवसांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. त्यानुसार 28 मार्च ते 12 एप्रिल दरम्यान 10 संघांमध्ये एकूण 20 सामने खेळवण्यात येणार आहे. या दरम्यान एकूण 4 डबल हेडर सामने होणार आहेत. त्यामुळे चाहत्यांना उर्वरित सामन्यांच्या वेळापत्रकाची प्रतिक्षा आहे. अशात बीसीसीआयकडून आता या उर्वरित वेळापत्रकाबाबत माहिती देण्यात आली आहे.
बीसीसीआय उपाध्यक्ष काय म्हणाले?
बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी उर्वरित वेळापत्रकाबाबत भाष्य केलं. एकूण 4 राज्यातील विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर होताच उर्वरित क्रिकेट सामन्यांच्याही तारखा जाहीर केल्या जातील अशी माहिती बीसीसीआय उपाध्यक्षांनी दिली.
16 दिवस आणि 20 सामने
बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील वेळापत्रकानुसार, 19 व्या मोसमात 28 मार्च ते 12 एप्रिल दरम्यान प्रत्येक संघाला किमान 3-4 सामने खेळण्याची संधी मिळेल. मोसमातील सलामीचा सामना हा 28 मार्च रोजी होणार आहे. या सामन्यात गतविजेता आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. गतविजेता आरसीबी या मोसमात विजयी सलामी देण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आयपीएलवर इलेक्शन इफेक्ट
देशातील 10 किंवा त्यापेक्षा अधिक शहरांमध्ये आयपीएल स्पर्धेचं आयोजन केलं जातं. मात्र यंदा तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे एकाच वेळेस निवडणुका आणि सामन्यांमुळे सुरक्षा-व्यवस्थेचा पेच निर्माण होतो. त्यामुळे समन्वय आणि समतोल राखता यावा यामुळे बीसीसीआयने संपूर्ण वेळापत्रक जाहीर केलं नाही.
निवडणूक आयोग ठरवणार 19 व्या मोसमातील उर्वरित सामन्यांचं वेळापत्रक!
“आयपीएलच्या 19 व्या मोसमातील सामने नियोजित वेळापत्रकानुसार होतील. आम्ही पहिल्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आम्ही उर्वरित वेळापत्रकही लवकरच जाहीर करु”, असं राजीव शुक्ला यांनी नमूद केलं. याचाच अर्थ निवडणूक आयोगाच्या घोषणेवर आयपीएलच्या 19 व्या मोसमातील उर्वरित वेळापत्रकात भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे यंदा वेळापत्रक कधी जाहीर होणार हे बीसीसीआयपेक्षा निवडणूक आयोग ठरवेल, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
Leave a Reply