
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला अजून 2 महिन्यांचा अवधी बाकी आहे. वर्ल्ड कप स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. मात्र भारतात वर्ल्ड कप होत असल्याने आतापासूनच चाहत्यांना या स्पर्धेची प्रतिक्षा आहे. बीसीसीआय निवड समितीने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी यजमान भारतीय संघाची 20 डिसेंबरला घोषणा केली. त्यानंतर मंगळवारी 30 डिसेंबरला वर्ल्ड कपसाठी 2 संघांची घोषणा करण्यात आली आहे. इंग्लंडनंतर वर्ल्ड कपसाठी ओमान क्रिकेट संघ जाहीर करण्यात आला आहे. ओमान क्रिकेटकडून सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
मुंबईकर करण सोनावलेचा समावेश
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेसाठी ओमान संघात मुंबई पूर्व उपनगरमधील विक्रोळीतील करण सोनावले याचा समावेश करण्यात आला आहे. तसेच जतिंदर सिंह याच्याकडे ओमानच्या नेतृत्वाची धुरा देण्यात आली आहे. ओमानच्या संघात बहुतांश खेळाडू हे भारतीय आहेत, जे नोकरी आणि इतर कारणामुळे तिथे स्थायिक झाले आहेत.
जतिंदर सिंहकडे ओमानचं नेतृत्व
ओमानचं नेतृत्व करणारा जतिंदर सिंह हा पंजाबमधील लुधियानाचा आहे. जतिंदर अंडर 19 क्रिकेट खेळला आहे. तसेच जतिंदरने 2012 साली आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं. तसेच विनायक शुक्ला याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे. ओमानने आयसीसी आशिया-इएपी पात्रता फेरीतून टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेचं तिकीट मिळवलंय. ओमानची टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याची चौथी वेळ असणार आहे. ओमान याआधी 2024, 2021 आणि 2016 टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी झाली आहे.
ओमानचं मिशन वर्ल्ड कप
ओमानचा वर्ल्ड कप स्पर्धेसाठी बी ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे. ओमानव्यतिरिक्त या ग्रुपमध्ये यजमान श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड आणि झिंबाब्वे या संघांचा समावेश आहे.
ओमानचं वेळापत्रक
पहिला सामना, विरुद्ध झिंबाब्वे, 9 फेब्रुवारी
दुसरा सामना, विरुद्ध श्रीलंका, 12 फेब्रुवारी
तिसरा सामना, विरुद्ध आयर्लंड, 14 फेब्रुवारी
चौथा सामना, विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 20 फेब्रुवारी
आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी ओमान टीम : जतिंदर सिंह (कर्णधार), विनायक शुक्ला (उपकर्णधार), मोहम्मद नदीम, शकील अहमद, हम्माद मिर्जा, वसीम अली, करण सोनावले, फैसल शाह, नदीम खान, सुफयान महमूद, जय ओडेदरा, शफीक जान, आशीष ओडेदरा, जितेन रामानंदी आणि हसनैन अली शाह.
Leave a Reply