
आज पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे अमेरिका-इराणमध्ये शांतता चर्चेला सुरुवात होणार आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुज जल वाहतुकीसाठी पूर्णपणे खुल करण्याच्या अटीवर अमेरिका-इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी सीजफायरची घोषणा झाली आहे. पण इराणकडून या अटीच पालन होत नाहीय. इराणने अजूनही हॉर्मुजमधील जलवाहतूक बंद ठेवली आहे. हॉर्मुजमधून जाण्याआधी जहाजांना इराणची परवानगी घ्यावी लागत आहे. त्यामुळे जागतिक तेल व्यापार अजूनही सुरळीत झालेला नाही. स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमध्ये आपल्याला टोल वसुलीला कायदेशीर मान्यता द्यावी अशी इराणची मागणी आहे. दरम्यान इराणने इथून पास होणाऱ्या काही जहाजांकडून टोल वसुली सुरु केल्याचं वृत्त आहे. इराणने काही जहाजांकडून टोल पोटी 20 लाख डॉलर्स घेतल्याचं वृत्त आहे.
भारताचा अशा प्रकारच्या कुठल्याही टोल वसुलीला विरोध आहे. समुद्री मार्गावरुन मुक्त आणि सुरक्षित जलवाहतूक, व्यापार हीच भूमिका भारताने सातत्याने मांडली आहे. ‘हॉर्मुज पार करण्यासाठी काही जहाजांकडून शुल्कापोटी 20 लाख डॉलर वसूल केलं, यातून इराणी ताकद दिसून येते’ असं इराणी संसदेच्या राष्ट्रीय सुरक्षा समिती सदस्याने इराणच्या सरकारी वाहिनीशी बोलताना सांगितलं. स्ट्रेट ऑफ हॉर्मुज हा इराण आणि ओमानमधील अरुंद जलमार्ग आहे, जो पर्शियन गल्फला अरबी सागराशी जोडतो. जगातील जवळपास 20 टक्के तेल आणि गॅस वाहतूक या जलमार्गावरुन होते. इस्रायल-अमेरिकेने 28 फेब्रुवारीला इराणवर हल्ला केल्यापासून इराणने या अरुंद जलमार्गावरील वाहतूक रोखून धरली आहे. त्यामुळे जगातील अनेक देशात तेल आणि गॅस संकट निर्माण झालं आहे.
टोलवर भारताने काय म्हटलं?
मागच्या काही दिवसात इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमधून भारताची तेल आणि गॅस घेऊन येणारी काही जहाजं सोडली आहेत. भारताने कूटनितीक मार्गाने इराणशी चर्चा करुन हे साध्य केलं. पण इराण जे टोल आकारण्याचं बोलतोय, त्यावर अजून भारत आणि इराणमध्ये कुठलीही चर्चा झालेली नाही असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. टोल आकारण्याबद्दलचे काही रिपोर्ट आम्ही पाहिले आहेत. पण स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमधून पूर्णपणे मुक्त आणि सुरक्षित वाहतूक सुरु रहावी ही आमची भूमिका आहे. कालच्या आमच्या स्टेटमेंटमध्ये आम्ही हेच म्हटलं. यापुढेही तीच भूमिका राहिलं असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल म्हणाले.
भारताने किती टोल भरला?
सीजफायरची घोषणा होण्याआधी सुद्धा इराण टोल आकारत असल्याच्या बातम्या आलेल्या. भारत मित्र देश असल्याने इराणने भारतीय जहाजांना हॉर्मुज पार करण्याची परवानगी दिली. पण आपण सुद्धा टोल भरला का? भारताने अजूनपर्यंत तरी असा कुठलाही टोल भरलेला नाही. टोलपोटी एक पैसाही इराणला दिलेला नाही.
Leave a Reply